स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणात नवीन घडामोड (Kunal Kamra) समोर आली आहे. कुणाल कामराच्या नया भारत या शोला उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांनाही समन्स बजावले आहे. या प्रकरणी भारतीय पोलीस सेवेतील माजी अधिकारी आणि आता वकील असलेले वायपी सिंग यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना ही माहिती दिली. मुंबई पोलिसांच्या या कार्यवाहीने प्रेक्षकांत भीतीचे वातावरण आहे. कुणाल कामराला चौकशीसाठी तीन वेळेस समन्स बजावण्यात आले आहे. मात्र तो अजूनही हजर झालेला नाही. दरम्यान, कुणाल कामराने एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे एक विडंबन गीत सादर केले होते. याचे संतप्त पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटले होते.
या गाण्यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली होती. यानंतर कामराला मद्रास हायकोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. दुसरीकडे मुंबई पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन चौकशी केली. दुसऱ्यांदा समन्स बजावूनही कुणाल कामरा का आला नाही याची चौकशी करण्यासाठी पोलिसांचे पथक त्याच्या घरी गेले होते. परंतु, त्याच्या घरच्यांनी तो येथे नाही असे सांगितल्यानंतर पोलिसांना रिकाम्या हातांनी परतावे लागले.
यासंदर्भात टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार कुणाल कामराने 2 फेब्रुवारी रोजी मुंबईतील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटेट स्टुडिओत नया भारत हा शो आयोजित केला होता. याच शोमध्ये कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका करणारे विडंबनात्मक गीत सादर केले होते. या शोला जे प्रेक्षक उपस्थित होते त्यांनाही पोलिसांना नोटीसा बजावल्या आहेत. प्रेक्षकांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत. काही जणांचे जबाब घेण्यास सुरुवातही झाली आहे. पोलिसांनी कलम 179 अंतर्गत या नोटीसा बजावल्या आहेत.
माजी आयपीएस अधिकारी वायपी सिंह म्हणाले, की पोलिसांना या शोमधील एक दोन प्रेक्षकांना चौकशीसाठी बोलावण्याचा अधिकार आहे. पण या प्रकरणात इलेक्ट्रॉनिक पुरावे उपलब्ध असल्याने प्रेक्षकांना चौकशीसाठी बोलावण्याची गरज नाही. परंतु, आता पोलिसांनी बहुतांश प्रेक्षकांना नोटीसा बजावल्याचे समजते. पोलिसांच्या या कारवाईने प्रेक्षकांत खळबळ उडाली आहे.