बुलढाणा जिल्ह्यातून सकाली सकाळी एक वाईट बातमी समोर आली आहे. (Accident) बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते शेगाव रोडवर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असून जखमींपैकी 6 लोकांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव ते शेगाव रोडवर जयपुर लांडे फाटा समोर हा विचित्र अपघात झाला आहे. पुणे येथून परतवाडा येथे जाणाऱ्या एसटी बसला मागून आधी एका चारचाकी वाहनाने धडक दिली, त्यानतंर एका खाजगी ट्रॅव्हल्सने या दोन्ही वाहनांना उडवले. या तिहेरी अपघातात गाड्यांचेही बरेच नुकसान झाले. आज पहाटे पाच वाजता झालेल्या या तिहेरी अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 25 लोकं जखमी झालेत. त्यापैकी 6 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्दैवी तिहेरी अपघातामुळे मोठी खळबळ माजली असून अनेकांच्या जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
Accident समृद्धी महामार्गावरील पुलाचे लोखंडी अँगल तुटल्याने गाड्यांचे टायर फुटले
दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील दुसरबीड जवळील पुलावर लोखंडी अँगल तुटून उघडा पडल्याने अनेक गाड्यांचे टायर फुटले आणि अपघात झाले. तर अनेक गाड्यांचे यामधे नुकसान झाले असून अँब्युलन्स आणि इतर मदत मागूनही मिळाली नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान लोखंडी अँगल तुटून वर आल्याने अनेक गाड्या यावेळी महामार्गावर अडकून पडल्या होत्या. अनेक वाहनांचे टायर फुटल्याने वाहने रस्त्यात अडकून पडल्याने त्यांना लवकर मदत मिळाली नव्हती, काही वेळानंतर समृद्धी महामार्गावर पोलिस घटनास्थळी पोहचून ट्रॅफिक हटवण्यात आलं. आणि रस्ता सुरळीत केला. मात्र यामुळे याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकसानग्रस्त वाहने प्रवाशांनी टोल नाक्यावर लावून पुढच्या प्रवास सुरू केलाय, तर काहींना तिथेच थांबावे लागले.