जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटना, या ठिकाणी राजकारणांच्या नावावर करण्यात येणारी गुंडशाही यामुळे बीडचे नाव खराब होऊ लागले आहे. ज्यामुळे बीडचे पालकत्व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना देण्यात आले आहे. त्यामुळे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बीडमध्ये पोहोचलेले अजित पवार काही क्षणातच अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी (ता. 2 एप्रिल) सकाळी 8 च्या सुमारास जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार बीडमध्ये पोहोचले. परंतु, यावेळी हेलिकॉप्टरमधून उतरताच त्यांनी बीडच्या सर्व अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली आहे. तुम्हा अधिकाऱ्यांकडे चार तास आहेत, त्यामुळे त्यावेळात मी मागावलेली सर्व माहिती मला दुपारच्या बैठकीत हवीच आहे, असे अजित पवारांकडून हेलिपॅडवरच खडसावण्यात आले आहे. (Ajit Pawar scolded the officials upon reaching Beed)
बीडचे पालकमंत्री अजित पवार हे जिल्हा दौऱ्यावर पोहोचले आहेत. त्यांनी आज बुधवारी सकाळीच बीडमध्ये हजेरी लावली. यावेळी ते अधिकाऱ्यांवरच संतापलेले पाहायला मिळाले. त्याशिवाय त्यांनी प्रसार माध्यमांना सुद्धा खडेबोल सुनावले. बीडच्या हेलिपॅडवर उतरताच अजित पवारांनी सर्वात प्रथम जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांना धारेवर धरले. अजित पवारांच्या स्वागतासाठी त्यांचे कार्यकर्ते व अन्य लोक हेलिपॅडवर आल्याने आणि त्यामुळे गर्दी झाल्याने अजित पवार संतापले. मी महाराष्ट्रात फिरतो, पण असा बेशिस्तपणा पाहिला नाही. जरा शिस्त लावा. तुम्ही खरं तर या ठिकाणी लाइन आखली पाहिजे, अजिबात कोणाचेही लाड करायचे नाही, सरळ सांगायचे की अजितदादांना असे आवडत नाही, असे म्हणत बीडच्या एसपींना अजितदादांनी येताच धारेवर धरले.
यानंतर अजित पवारांनी पोलीस अधीक्षक, सीईओ आणि जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना सूचना करत म्हटले की, बीडमधील विमानतळ, रेल्वे लाइन, घरकुल याबाबतची सविस्तर माहिती देण्यास सांगितले आहे. दुपारपासून मिटिंग सुरू होतील. मी सुरुवात केल्यावर मग याची माहिती नाही, त्याची माहिती नाही, असे चालणार नाही. आता मला काय माहिती हवी आहे, ते तुम्हाला सांगितले जाईल. विमानतळ, रेल्वे लाइन, राष्ट्रीय महामार्ग असे बरेच मुद्दे काढले आहेत. आता साडेआठ वाजले आहेत, पुढच्या चार तासांमध्ये मला सगळी अप टू डेट माहिती हवी आहे, असा स्पष्ट आदेशच अजित पवारांनी दिला आहे. तर, डिसेंबरपर्यंत आपल्याला सगळं मार्गी लावायचे आहे. शेवटच्या क्षणाला सगळं चालणार नाही. डिसेंबरपर्यंत क्वालिटीची कामे होतात की नाही बघणार, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar झाले का तुमचे सुरू…
बीडमध्ये पोहोचलेल्या अजित पवारांनी केवळ अधिकाऱ्यांनाच नाही तर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाही खडसावले. दौऱ्यावर निघालेले अजित पवार गाडीजवळ जाताच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनीनी त्यांना आवाज दिला. ज्यानंतर “तुमचे सुरू झाले का? कामाला येतोय तर काम करुद्या. संध्याकाळी पत्रकार परिषद आहे ना. त्यावेळी मी बोलेन.” असे सांगत अजित पवारांनी आता काहीही बोलण्यास नकार दिल्याचे पाहायला मिळाले.