पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना शहाजहाँ प्रमाणे कोंडून ठेवले आणि ते दोन वेळा पंतप्रधान झाले. भाजपने मुगल संस्कृतीप्रमाणे त्यांना सत्तेपासून बेदखल केले. तेव्हा आम्ही विचारले का, की मुगल संस्कृती प्रमाणे का वागले? असा खोचक सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींच्या निवृत्तीचा आज पुनरुच्चार केला आहे.
Sanjay Raut राम-कृष्णही अवतारकार्य संपल्यावर गेले
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, 17 सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदी वयाची 75 वर्षे पूर्ण करणार आहेत. निवृत्तीसंबधीचा निर्णय घेण्यासाठीच ते नागपूरला संघ मुख्यालयात गेले होते, असा दावा संजय राऊत यांनी आज पुन्हा केला आहे. संजय राऊत यांच्या दाव्यावर रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो. ही सगळी मुगल संस्कृती आहे, त्यामुळे आता कोणाचाही, कुठेही उत्तराधिकारी निवडण्याची वेळही आलेली नाही, असे प्रत्युत्तर दिले होते. आता खासदार संजय राऊत यांनी राम-कृष्णही अवतारकार्य संपल्यावर गेले होते, नरेंद्र मोदींनाही जावं लागेल, असा पलटवार केला आहे. त्यासाठी त्यांनी मोदींच्याच नियमांचा हवाला दिला आहे.
17 सप्टेंबरला नरेंद्र मोदी हे 75 वर्ष पूर्ण करत आहेत. त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना निवृत्त व्हावे लागत आहे. हे देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीत, त्यांनी कितीही बोलू द्या आणि त्यांनी जे सांगितले आहे की, बाप जिवंत असताना वारसदार ठरवला जात नाही, मुगल संस्कृती आहे. कोण बाप? मोदी हे पंतप्रधान आहेत. एक तात्पुरती व्यवस्था असते. राम आणि कृष्ण आले आणि त्यांचे अवतारकार्य संपल्यावर गेले. त्यांनी जे काय कार्य हातात घेतले होते ते संपल्यावर ते निघून गेले. नरेंद्र मोदी यांचे सुद्धा अवतारकार्य संपले आहे, त्यांना सुद्धा निघून जावे लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, लालकृष्ण आडवाणी जिवंत असताना त्यांना शहाजहाँ प्रमाणे कोंडून ठेवले आणि नरेंद्र मोदी दोन वेळा पंतप्रधान झाले. मुगल संस्कृतीप्रमाणे त्यांना सत्तेपासून बेदखल केले. तेव्हा आम्ही विचारले का, की तुम्ही मुगल संस्कृती प्रमाणे का वागले? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. लालकृष्ण आडवाणी यांचा पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदावर हक्क होता. तो त्यांना का दिला नाही, असा सवाल संजय राऊत यांनी केली.
Sanjay Raut राऊतांनी भाजप आडवाणींचा इतिहासच सांगितला…
भारतीय जनता पक्षाचा डोलारा लालकृष्ण आडवाणी यांनी उभा केला. आजचा भारतीय जनता पक्ष ,वैभवशाली भारतीय जनता पक्ष आहे. दोन जागांपासून सत्तेच्या शिखरावर नेण्याचे काम लालकृष्ण आडवाणी यांच्यासारख्या संघर्षमय नेत्यांनी केले. अयोध्येचे अख्खे आंदोलन त्यांनी उभे केले. आज जे राम, राम, राम आता करत आहेत, राम ते राष्ट्रमधला राजकारणात आलेला जो राम आहे, तो लालकृष्ण आडवाणी यांच्यामुळे आला आहे. म्हणून या देशातली जनता राममय झाली. त्यांचा पंतप्रधान पदाचा हक्क असताना शहाजहाँ प्रमाणे मुगल संस्कृतीप्रमाणे त्यांना एक प्रकारे सत्तेवरून बंदीवान आणि बेदखल केले आणि हे स्वतः पंतप्रधान झाले, तेव्हा आम्ही विचारले का मुगल संस्कृती आहे म्हणून? हे राजकारण आहे, तुम्ही राजकारण केले, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
भाजप आणि संघ यांच्यातील संबंध कसे असावे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर माझ्या सारख्या बाहेरच्या माणसाने भाष्य करण्याची गरज नाही, असेही राऊत म्हणाले. मात्र संघ आणि भाजपमध्ये काय चर्चा सुरु आहे, याची माहिती आमच्याकडे येत असते, असा दावाही त्यांनी केला.
Sanjay Raut का होत आहे नरेंद्र मोदींच्या निवृत्तीची चर्चा?
नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी पक्षातील वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या नेत्यांना सत्तापदापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या नेत्यांचे मार्गदर्शक मंडळ भाजपने स्थापन केले होते. यामध्ये लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक नेत्यांची वर्णी लावली होती. त्यांना सत्ता पदापासून दूर ठेवण्यात आले होते. येत्या 17 सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदी हे 75 वर्षांचे होणार आहेत. त्यांनी तयार केलेला नियम आता ते पाळणार आणि सत्तापदापासून दूर जाणार असा दावा शिवसेना ठाकरे गटाकडून केला जात आहे.
पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी गेल्या 11 वर्षांत प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात आले होते. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत आणि मोदी यांच्यात त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांचा वारसदार कोण यावर चर्चा झाल्याचाही संजय राऊत यांचा दावा आहे.