आजपासून म्हणजेच १ एप्रिल २०२५ पासून महाराष्ट्रातील टोल व्यवस्थापनात मोठा बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) टोल नाक्यांवर आता फक्त FASTagद्वारेच टोल भरता येणार आहे. कोणतीही इतर पद्धत मान्य नसल्यामुळे फास्टॅगशिवाय टोल भरणाऱ्या वाहनचालकांना आता दुप्पट शुल्क भरावे लागणार आहे.
FASTag हायब्रीड मार्गिका बंद, फक्त फास्टॅग सक्ती
यापूर्वी टोल वसुलीसाठी हायब्रीड पद्धत वापरण्यात येत होती. यातून रोख रक्कम, डेबिट/क्रेडिट कार्ड, स्मार्ट कार्ड, QR कोड, POS मशीन आदींनी टोल भरण्याची सुविधा होती. मात्र, आता ही सर्व माध्यमे बंद करून सर्व टोल मार्गिका फास्टॅगसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. महामंडळाने कडक अंमलबजावणीचा इशारा दिला असून, फास्टॅग नसलेल्यांकडून दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे.
FASTag वाहनचालकांसाठी महत्त्वाची सूचना
– प्रवास करण्याआधी फास्टॅगची वैधता तपासा
– खात्यात पुरेशी रक्कम असल्याची खात्री करा
– फास्टॅग नसल्यास लवकरात लवकर तो खरेदी करून वाहनावर लावा
एमएसआरडीसीच्या ९ रस्ते प्रकल्पांतर्गत हे नियम लागू करण्यात आले असून, राज्यभरातील प्रमुख टोल नाक्यांवर हे बंधन लागू आहे.
फास्टॅग सक्तीचे टोल नाके:
वांद्रे वरळी सागरी सेतू
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे व जुना मार्ग
मुंबई प्रवेशद्वारावरील पाच टोल नाके
समृद्धी महामार्गावरील २३ टोल नाके
नागपूर शहरातील ५ टोल नाके
सोलापूर शहरातील ४ टोल नाके
संभाजीनगर शहरातील ३ टोल नाके
काटोल बायपास
चिमूर-वरोरा-वणी मार्ग
यामुळे राज्यातील वाहनधारकांनी फास्टॅग लावणे अनिवार्य असून, प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी तयारी ठेवणे आवश्यक आहे.
FASTag दुप्पट टोल म्हणजे नेमकं किती?
उदाहरणार्थ, एखाद्या टोल नाक्यावर वाहनासाठी टोल 100 रुपये असेल, तर फास्टॅगशिवाय त्या वाहनचालकाला 200 रुपये भरावे लागतील. यामुळे आर्थिक फटका बसण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी त्वरित फास्टॅग वापरणे गरजेचे आहे.