गुढीपाडवा म्हणजे शुभसंकल्पाचा दिवस आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त. अशा या शुभदिनी सोनं खरेदी (Gold Rate) करण्याची परंपरा जपणारे नागरिक यंदा विक्रमी दर असूनही मोठ्या संख्येने दागिने आणि नाणी खरेदी करताना दिसले. विशेषतः जळगावसारख्या सुवर्णनगरीत तब्बल २५ ते ३० कोटींची उलाढाल झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोनं खरेदीत २०% वाढ झाली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या दरात तब्बल १८ हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याचा दर ९० हजार रुपयांच्या घरात पोहोचला आहे. एवढ्या दरवाढीनंतरही ग्राहकांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्यास मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे सोनं केवळ सौंदर्य किंवा परंपरेपुरतं मर्यादित न राहता, गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणूनही पुढे येत आहे.
Gold Rate सोन्याच्या नाण्यांना गुंतवणुकीसाठी पसंती
गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांचा कल पारंपरिक दागिन्यांपेक्षा सोन्याच्या नाण्यांकडे झुकलेला दिसतो. गुंतवणुकीच्या दृष्टीने सुरक्षित आणि सोप्या पर्यायाच्या शोधात असलेल्या नागरिकांनी यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या कॉईनला अधिक पसंती दिली आहे.
सणासुदीच्या काळात पारंपरिक दागिन्यांची मागणी असतेच, मात्र यंदा गुंतवणूक म्हणूनही मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे. सोने विक्रेत्यांनी देखील यासाठी खास ऑफर आणि आकर्षक स्कीम्स जाहीर केल्या होत्या, ज्याचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी खरेदी केली.
Gold Rate बेरोजगारीच्या छायेतही ‘सोनं’ झळकलं
राज्यातील अनेक भागांत बेरोजगारी आणि महागाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त असतानाही, गुढीपाडव्यासारख्या शुभदिनी सोनं खरेदी करण्याची मानसिकता कायम आहे. जळगावात याचाच प्रत्यय आला. दागिन्यांच्या दुकानांमध्ये सकाळपासूनच खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती आणि दिवसभरात कोट्यवधींची उलाढाल झाली.
हे चित्र पाहता सोनं ही केवळ एक वस्तू नाही तर श्रद्धा, परंपरा आणि सुरक्षित गुंतवणुकीचं प्रतीक आहे हे पुन्हा अधोरेखित होतं. आगामी अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवरही अशीच खरेदी वाढण्याची शक्यता आहे.