महाराष्ट्रातील प्रश्न सोडवणार असेल तर भाजपला (BJP) पाठिंबा असं, सूचक वक्तव्य राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात बोलताना केलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. लोकसभेत राज ठाकरेंनी (MNS) भाजपला पाठिंबा दिला होता. आता आगामी निवडणुकांमध्ये मनसे कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, राजकारणात चिखल झालाय. यावेळी त्यांनी औरंगजेबाची कबर, गंगा नदीचं प्रदुषण, लाडकी बहीण योजना, सोबतच बीडमधील संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरण यावर भाष्य केलंय.
यावेळी बोलताना राज ठाकर् म्हणाले की, रोजगार, कामगार, शेतकऱ्यांचे विषय बाजूला टाकले जात आहेत. संतोष देशमुखांना किती घाणेरड्या पद्धतीनं मारलं. तुमच्या नसानसांमध्ये इतकी क्रूरता असेल तर मी जागा दाखवेन. हे सगळं विंड मिल आणि तिथल्या राखेतून झालंय. राखेमधून गुंड तयार होतात, असा देखील टोला त्यांनी लगावला आहे. संतोष देशमुखांनी विरोध या सगळ्याला केला होता. विषय खंडणीचा विरोध करणाऱ्यांचा होता. वंजाऱ्याने मराठ्याला मारलं, यात जातीपातीचा काय विषय? राजकीय पक्ष जातीपातीत अडकवत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय. तर मराठवाड्यात रोजगार निर्मिती होत नाही. शेतकऱ्यांच्या दिवसाला सात आत्महत्या होत असल्याचं देखील राज ठाकरेंनी म्हटलंय.
मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिलंच भाष्य गंगेच्या प्रदुषणावर केलंय. ते म्हटले की, मी कुंभमेळाव्याचं पाणी प्यायलो नाही असं म्हटलं, त्यानंतर काहींना वाटलं की मी कुंभमेळाच्या (Kumbhmela) अपमान करतोय. परंतु प्रश्न कुंभमेळाच्या नसून गंगेच्या पाण्याचं असल्याचं देखील राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय. गंगेत अर्धवट जाळलेली प्रेतं टाकली जातात, हे पाणी पिण्यासाठी काय तर अंघोळीसाठी देखील योग्य नाही, असं त्यांनी जाहीर सभेत म्हटलंय.
राज ठाकरे यांनी मेळाव्यात बोलताना एक व्हिडीओ देखील शेअर केलाय. गंगेच्या शुद्धीकरणासाठी 33 हजार कोटी खर्च करण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं. एका महंताला गंगेत तसंच टाकून देण्यात आलं. अर्धवट प्रेत जाळून तसंच गंगेत टाकलं जातं. जर धर्म अशा प्रकारे आडवा येत असंल तर काय करायचं? असा देखील सवाल त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्रातल्या नद्यांची देखील हीच परिस्थिती आहे. सावित्री नदीची अवस्था तीच आहे. देशभरामध्ये 311 नदीपट्टे हे प्रदूषित आहेत, तर यात राज्यातील 55 नद्यांचा समावेश आहे. नगर जिल्ह्यातील महाराष्ट्र सैनिक कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेवून पायीपायी इथे आलाय, तो प्रमोद आरणे. हीच माझी ऊर्जा आहे, असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय.