गुढीपाडव्याच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केली. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने आणि त्यांची अंमलबजावणी न झाल्याबद्दल त्यांनी सरकारला जाब विचारला. विशेषतः ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत त्यांनी थेट भाकित वर्तवत ती योजना सरकारकडून बंद केली जाण्याची शक्यता व्यक्त केली. (Raj Thackeray)
Raj Thackeray कर्जमाफीपासून ‘लाडकी बहीण’ योजनेपर्यंत सरकारवर घणाघात
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा 2025 च्या भाषणात सरकारच्या अनेक धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी म्हटले की, “निवडणुकीपूर्वी सांगितले होते की कर्जमाफी होणार, पण आता अजित पवार (Ajit Pawar) म्हणतात की 30 मार्चपूर्वी पैसे भरा. म्हणजे निवडणुकीआधी काहीही आश्वासन द्यायचं आणि निवडणुकीनंतर हात वर.”
‘लाडकी बहीण’ योजनेच्या संदर्भात राज ठाकरे म्हणाले की, ही योजना सरकारकडून बंद केली जाणार आहे, कारण त्याचा वार्षिक खर्च तब्बल 60 हजार कोटी रुपये आहे. हे सरकारला चालविणे परवडणारे नाही, असे सांगत त्यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली.
Raj Thackeray मराठी अस्मिता, बेरोजगारी आणि सामाजिक अन्यायावर थेट भाष्य
भाषणात त्यांनी मराठा समाजाच्या परिस्थितीकडेही लक्ष वेधले. त्यांनी विचारले की, “इतके मराठा मुख्यमंत्री झाले, पण मराठा समाजाची स्थिती का सुधारली नाही? जात एकमेकांना सांभाळत नाही.” त्यांनी तरुणांच्या बेरोजगारीवर चिंता व्यक्त करत म्हटले की, सध्याच्या राजकारणात तरुण-तरुणी जातीय वादात अडकवले जात आहेत, त्यांना नोकरी, शिक्षण यासाठी लढण्याऐवजी एकमेकांविरोधात उभे केले जात आहे. “मराठी माणूस सध्या असुरक्षित आहे,” असे सांगताना त्यांनी टोला लगावत म्हटले की, “कोणी जर मराठी नको म्हणालं, तर त्याचे कानफाट फोडेन. उद्यापासून बँकांमध्ये जाऊन तपासा मराठीत व्यवहार होतो का; नसेल तर त्यांना भाग पाडा.”