मुंबईत (Mumbai 31) मार्च रोजी हलका, तर 1 आणि 2 एप्रिल रोजी काहीसा तीव्र स्वरूपाचा ढगांच्या गडगडाटासह पाऊस पाडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तसेच ठाणे, पालघर आदी परिसरातसुद्धा 31 मार्च रोजी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या भागासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस झाल्यास मुंबईतील नालेसफाईच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारत येत नाही. (The Meteorological Department has warned of unseasonal rains, which will affect the drain cleaning work in Mumbai)
मुंबईत 25 मार्चपासून नालेसफाईचे काम चालू करण्यात आले आहे. अशावेळी अवकाळी पाऊस पडल्यास विशेषतः जोरदार स्वरूपाचा पाऊस 31 मार्च रोजी अथवा 1 आणि 2 एप्रिल रोजी पडल्यास नाल्यातून काढण्यात आलेला गाळ सुकण्याऐवजी पुन्हा ओला होईल. त्यामुळे नालेसफाईची कामे करणाऱ्या कंत्राटदाराला पुन्हा गाळ सुका होईपर्यंत रखडावे लागणार आहे. पावसामुळे सर्व ठिकाणी नाल्यालगत काढून ठेवलेला गाळ सुकण्याऐवजी ओलसर होईल आणि तो वाहून रस्त्यावर येण्याती भीती आहे.
आयएमडी कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळांमध्ये आज तापमान अनुक्रमे 34.5 आणि 36.3 नोंदवले गेले, जे सामान्यापेक्षा 2.2 आणि 2.9 सेल्सियस अंशांनी जास्त आहे. मागील दिवशी कुलाबा येथे 31.8 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे 33.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्या तुलनेत तापमानात मोठी वाढ झाली आहे. स्थानिक उष्णता आणि वाऱ्याच्या टक्करीमुळे राज्यात मान्सूनपूर्व पाऊस आणि गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच 1 ते 4 एप्रिलदरम्यान मुंबई आणि एमएमआरमध्ये विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
31 मार्च रोजी ठाणे आणि पालघरमध्ये काही ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. या भागासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मार्च महिन्यात मान्सूनपूर्व पावसाचा मुंबईत इतिहास आहे. यावर्षीही तोच ट्रेंड दिसून येत आहे. मार्च 2023 मध्ये सर्वात जास्त म्हणजे 17.1 मिमी पाऊस पडला होता, तर मार्च 2016 मध्ये 10 मिमी आणि मार्च 2015 मध्ये 6.5 मिमी पाऊस पडला होता.