बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्वाचे अपडेट समोर आले आहे. या प्रकरणात आवादा एनर्जी कंपनीबाहेर चहाच्या टपरीवर चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शीचा जबाब नोंदवला गेला आहे. या खटल्यात हा जबाब महत्त्वाचा ठरणार आहे. या जबाबामुळे आरोपींच्या अडचणी वाढणार आहे. खंडणी मागितल्याचा प्रत्यक्षदर्शी व्यक्ती हा ठरला आहे.
Santosh Deshmukh त्या व्यक्तीच्या समोर काय घडले?
सहा डिसेंबर 2024 रोजी दुपारी साडेबारा वाजता सुदर्शन घुले त्याच्या साथीदारासोबत आवादा एनर्जी कंपनीच्या गेटवर पोहोचला. या दरम्यान त्याने गेटवरील वॉचमनला शिवीगाळ केली. त्याचवेळी कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे तिथे दाखल झाले. त्यांना सुदर्शन घुले याने “वाल्मीक कराडचा माणूस आहे. कंपनी सुरू ठेवायचे असेल तर दोन कोटी रुपये खंडणी अण्णाला द्या” अशी धमकी दिली. त्यावेळी सरपंच देशमुख घटनास्थळावर दाखल झाले आणि सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदाराला कंपनी बंद करू नका गावातील लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती करू लागले, असे कंपनीबाहेर चहा पिणाऱ्या व्यक्तीने सांगितले.
Santosh Deshmukh सुदर्शन घुले यांने दिली धमकी
संतोष देशमुख यांची विनंती सुदर्शन घुले याने ऐकली नाही. उलट सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचा जबाब त्या ठिकाणच्या चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने दिला आहे. या जबाबामुळे आरोपींचे पाय आणखी खोलात जात आहेत.
Santosh Deshmukh फास्टट्रॅक कोर्टात प्रकरण चालवा
दरम्यान, या खटल्याबाबत बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, संतोष अण्णा यांच्या हत्येचे प्रकरण न्याय प्रविष्ठ झाले आहे. सुनावणी सुरु झाली आहे. या दरम्यान जे काय युक्तीवाद झाला त्यातून संघटीत गुन्हेगारी समोर आली आहे. मी आधीपासून म्हणत आहे की, हे सगळे आरोपी एकच आहेत. अपहरण, खून करणारे आरोपी एकच आहेत. या आरोपींनी अपहरण करून हत्या केली आहे. त्या संदर्भात उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट शब्दांमध्ये प्रसार माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आता या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी झाली पाहिजे. हे सगळे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालले पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे धनंजय देशमुख यांनी म्हटले.