गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुन्हा शिंदे गट वि. ठाकरे गट या वादाला सुरुवात झाली आहे. याच मुद्द्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले आहे. एकनाथ शिंदेंकडे आज जे काही ते उद्धव ठाकरेंच्या मेहेरबानीमुळे आहे. त्यामुळे जर का त्यांच्या जीवनामध्ये कृतज्ञता हा शब्द असेल तर त्यांनी ते असायला हवे, असे राऊतांनी म्हटले आहे. तर एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंचे प्रोडक्शन आहे, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे. (Sanjay Raut said that whatever Eknath Shinde has is because of Uddhav Thackeray)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी (ता. 27 मार्च) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, एकनाथ शिंदे किंवा आम्ही सगळे कोण होतो? शिवसेना या चार अक्षरामुळे आम्ही सगळे निर्माण झालो. विशेषतः एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांचेच प्रोडक्शन आहे. आम्ही सगळे बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेले लोक आहोत. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या लोकांना आयुष्यात जे काही मिळाले आहे, ते उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाल्यानंतर मिळाले आहे. त्याआधी त्यांना फार काही मिळाले आहे, असे मला वाटत नाही. त्याआधी ते फार सक्रीयही नव्हते. पण एकनाथ शिंदे यांना जे काही मिळाले आहे, ते एकनाथ शिंदे यांच्या मेहेरबानीतूनतच मिळाले आहे. हे लक्षात घ्या, असे यावेळी राऊतांनी म्हटले.
मोठी बातमी! संतोष देशमुखांच्या हत्येची तीन आरोपींची कबुली
खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या जीवनामध्ये कृतज्ञता हा शब्द असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंप्रती कृतज्ञ असायला पाहिजे. मतभेद झाले आहेत, त्यामुळे तुम्ही सोडून गेलात हे ठीक आहे. आम्ही तुमच्यावर, तुम्ही आमच्यावर टीका करता, पण ज्या प्रकारची भाषा ते उद्धव ठाकरेंसाठी वापरत आहेत. त्याकरिता त्यांनी स्वतःचे आत्मपरिक्षण केले पाहिजे. ज्या दिवशी मोदी आणि शहांचे छत्र त्यांच्यावर नसेल, त्या दिवशी ते कुठे असतील याचा विचार त्यांनी आणि त्यांच्या लोकांनी केदारनाथच्या गुहेत किंवा गुवाहाटीच्या कामाख्याच्या मंदिरात जाऊन तिथे बसून करायला पाहिजे, असा टोला खासदार राऊतांनी लगावला आहे.
तर, मी या मताचा आहे की आज एकनाथ शिंदे आजे जे स्वतःचे वजन दाखवत आहेत. आर्थिक, सत्तेचे.. त्याचे मूळ उद्धव ठाकरेंनी दिलेल्या ऊर्जेमध्ये आहे. म्हणतात की कचऱ्यातून उर्जा मिळते. त्याच कचऱ्यातून सर्वाधिक उर्जा ही उद्धव ठाकरेंनी दिली. उद्धव ठाकरेंनी या लोकांना उर्जा दिली नसती तर काय झाले असते? ही अशी उर्जा त्यांना देऊ नका, हा माणूस घात करेल हे सांगणारे ठाण्यातले लोकं आज त्यांच्याच (शिंदेच्या) अवतीभवती आहेत. ठाण्यात जे आमदार, खासदार आहेत ना आसपासचे, हे सगळे उद्धव ठाकरेंना ‘मस्के’ लावायला आले होते, असे म्हणत राऊतांनी निशाणा साधला. साहेब हे करू नका, हा माणूस (शिंदे) तुम्हाला दगा देईल, याची नियत चांगली नाही, हे सांगणारे लोकंच आज त्यांच्याभोवती आहेत. आम्ही त्याला साक्षीदार आहोत, असा दावा करत एकनाथ शिंदेंनी जपून पावले टाकावी, असा सल्ला राऊतांकडून देण्यात आला आहे.