मस्साजोगचे सरपंच संतोष देशमु्ख यांची (Santosh Deshmukh Case) अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आता एक मोठी अपडेट मिळाली आहे. वाल्मिक कराडच्या टोळीतील तिघा जणांनी संतोष देशमुख यांची हत्या आपणच केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. आरोपींच्या या कबुलीमुळे वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या तिघांनी पोलीस चौकशीत हत्येची कबुली दिली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी वाल्मिक कराडसह त्याच्या चेल्यांना अटक केली होती. या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र अजूनही फरार आहे. त्याचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. मात्र अजून तरी तो पोलिसांच्य हाती लागलेला नाही.
संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं होतं. यामध्ये सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे हे आरोपी होते. या टोळीचा म्होरक्या सुदर्शन घुले याने पोलीस कस्टडीत जबाब दिला आहे. सुदर्शन घुले सुरुवातीला या हत्या प्रकरणातील आपला सहभाग नाकारत होता. नंतर पोलिसांनी त्याला आवादा कंपनीच्या मॅनेजरकडून खंडणी मागतानाचा व्हिडिओ दाखवला. यानंतर मात्र त्याने बोलण्यास सुरुवात केली. सुदर्शन घुलेने आम्हीच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन खून केला अशी कबुली पोलिसांना दिली.
Santosh Deshmukh Case ..म्हणून संतोष देशमुखांची हत्या झाली
सुदर्शन घुलेने पोलिसांना सांगितले की मयत संतोष देशमुख यांनी सुद्धा आम्हाला मारहाण केली होती. आमचा अपमान केला होता. त्यादिवशी आमच्या मित्राचा वाढदिवस होता तेव्हाच संतोष देशमुख यांनी आम्हाला मारहाण केली. मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आम्हाला आव्हान दिले होते. संतोष देशमुख यांच्या या कृतीचा आम्हाला राग आला होता म्हणून आम्ही त्यांना मारण्याचा प्लॅन आखला होता, असे घुले याने सांगितले.