होळी संपल्यानंतर उन्हाचा पारा वाढला आहे. महाराष्ट्र होरपळला आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. जणू राज्यावर सूर्य देव कोपला आहे.छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. तर दुसरीकडे धरणांतील जलसाठा कमी व्हायला लागला आहे. राज्यातल्या धरणात ४९ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. तापमान 40 अंशाच्या पुढे सरकल्याने हवामान खात्याने बाहेर फिरताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
Heat Wave सोयगाव तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. सोयगाव तालुक्यात काल 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते. या तापमानामुळे सोयगाव तालुक्यात पहिला बळी गेला आहे. निमखेडी बस थांब्यावरील ही घटना घडली. उन्हात बस थांब्यात विसावा घेणार्या एका प्रवाशाचा उष्मघातामुळे मृत्यू झाला. अमोल दामोदर बावस्कर असे उष्मघातामुळे मृत्यू झालेल्या 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे. सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Heat Wave मुंबईकरांनो, काळजी घ्या
शनिवारपासून मुंबईत तापमान वाढण्याची शक्यता, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) या आठवड्याच्या शेवटपासून कमाल तापमान ३६°C पर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या मुंबईत तापमान साधारण ३३°C च्या आसपास आहे.
हवामान विभागानुसार, शनिवारपासून तापमान वाढू लागेल आणि ३१ मार्चपर्यंत ३५°C पर्यंत घसरेल. या कालावधीत आकाश मुख्यतः स्वच्छ राहील. एप्रिल १ ते ६ दरम्यान मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) काही भागांत प्री-मान्सूनच्या हलक्या पावसाची शक्यता आहे. मंगळवारी IMDच्या कुलाबा वेधशाळेत कमाल तापमान ३२.५°C आणि सांताक्रूझ वेधशाळेत ३३.५°C नोंदवले गेले. IMDच्या नोंदीनुसार, मुंबईत मार्च महिन्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान २८ मार्च १९५६ रोजी ४१.७°C नोंदवले गेले होते.
Heat Wave गोंदियात तापमान वाढले
मार्च महिना शेवटच्या टप्प्यावर असतानाच उन्हाचे चटके वाढले आहेत. अशात हवामान विभागाने एप्रिल महिन्यापासून उन्हाच्या झळा तीव्र होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गोंदिया जिल्ह्याचा पारा 36 अंशावर आहे. येत्या काही दिवसांत पारा आणखी वाढणार असून तापमान 40 अंशावर जाणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
Heat Wave जळगावमध्ये पारा 40 अंशावर
जळगाव जिल्ह्यात मार्च महिन्यातच तापमानाचा पारा 40 अंशावर पोहोचला आहे. तापमान 40 अंशावर पोहोचल्याने जळगाव जिल्ह्यात सर्वत्र उकाड्याचा त्रास वाढला आहे. मार्च महिन्यातच कडाकाचा उन्हाळा सहन करावा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हापासून बचावण्यासाठी नागरिक मठ्ठा तसेच शीतपेयांच्या दुकानांवर गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळी 9 वाजेपासून उन्हाचे चटके बसायला लागल्याने उन्हापासून बचावापासून नागरिक दुपारी बाहेर पडणे टाळत असल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी काळात जिल्ह्यात उष्णतेचे लाट येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज असल्याने जळगाव जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे
उष्णतेपासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती केली जात असून उघड्यावर काम करणाऱ्या कामगारांनी साठी सुरक्षिततेच्या उपाय योजना करण्यात आले आहेत. उष्णतेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष तसेच बेड ची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे.
Heat Wave उन्हाळ्याच्या तोंडावरच टँकर
उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. पाणी पातळीत घट होत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विहिरींनी देखील आता तळ गाठायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा बसायला आता सुरुवात झाली.छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात मागील 8 दिवसापूर्वी 16 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता मात्र त्यामध्ये आता भर पडून सद्यस्थितीत 36 गावांना 38 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान तापमानाचा पारा 39 अंशाच्या वर गेल्याने पाण्याचे बाष्पीभवन देखील होत आहे.
धHeat Wave रणाच्या घशाला हळूहळू कोरड
राज्यात एकीकडे तापमानात मोठी वाढ होत आहे, अनेक भागात पारा ४२ अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळे पाण्याची गरज वाढलीय. तापमान वाढल्याने दुसरीकडे राज्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या धरणांमधील पाणीसाठा कमी होतोय. सध्या राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून ४९ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
राज्यातील अनेक गावांमध्ये सध्या टॅंकरने पाणीपुरवठा सुरु आहे. तर दुसरीकडे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील धरणांमध्ये ४६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. तर अमरावती विभागात ५५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे विभागात ४७ टक्के, नाशिक विभागात ४९ टक्के आणि कोकण विभागात ५५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर मराठवाड्यातील धरणांमध्ये सध्या ४७ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. यंदाही पावसाळा लांबला, तर राज्यातील अनेक भागात पाणीटंचाईचं भीषण संकट निर्माण होऊ शकते.
Heat Wave विभागवार धरणातील पाणीसाठा काय
विभाग सध्याचा पाणीसाठा
मराठवाडा ४७ टक्के
नागपूर ४६ टक्के
अमरावती ५५ टक्के
नाशिक ४९ टक्के
पुणे ४७ टक्के
कोकण ५५ टक्के
राज्यातला एकूण ४९ टक्के पाणीसाठा