मंत्री जयकुमार गोरे यांना अडकवण्याच्या प्रकरणात शरद पवार यांच्या पक्षाचा मोठा हात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केला आहे. (Devendra Fadnavis) या प्रकरणात सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे आरोपी तुषार खरात याच्या संपर्कात होते. असा थेट आरोपच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते विधानसभेत बोलत होते. त्याचबरोबर विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी आम्ही तिघे एकमेकांच्या पायात पाय घालणार नाही. तर एकमेकांच्या हातात हात घेऊन काम करणारे असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
Devendra Fadnavis काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
जयकुमार गोरे यांच्यासंदर्भातील केस 2016 मध्ये रजिस्टर झाली असून 2019 मध्ये संपली, ते तेव्हा भाजपमध्ये नव्हते. मी त्यांच्या हिंमतीची दाद देतो, एखादा व्यक्ती अशा परिस्थितीत दोषी आहोत की नाही आहोत, घरच्यांना समाजात अपमान नको म्हणून अशा गोष्टी मिटवण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांनी लाचेची मागणी झाल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. तक्रारीनंतर ट्रॅप लावला, सगळं संभाषण टेप झालं, सगळी मागणी टेप झाली. मागणी टेप झाल्यानंतर पोलीस विभागाची खात्री पटली त्यानंतर सापळा रचला. पैसे देताना आरोपीला पकडलं. हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता.
Devendra Fadnavis कोणाला जीवनातून उठवणे चुकीचे
या प्रकरणात चार तक्रारी झाल्या आहेत. ही महिला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील आहे असा खोटा प्रचार करण्यात आला. या प्रकरणातील लोकांना अटक झाली आहे. एक ती महिला आहे. दुसरा तुषार खरात आणि तिसरा अनिल सुभेदार आहे. या सगळ्यांनी मिळून हा कट रचला. याबाबत सगळे पुरावे सापडले आहेत. त्यांचे व्हाट्सअप वरचे संभाषण सापडले आहे. त्यांचे दीडशे फोन झालेले आहेत. कट रचला हे लक्षात आले आहे. पण दुर्दैवाची गोष्टी पुढची आहे की, या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसून आलेत.
मी हे पुराव्यानिशी सांगत आहे. प्रभाकरराव देशमुख हे थेट तिन्ही आरोपींशी बोललेले आहेत. मला वाईट वाटतं ते म्हणजे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात आहेत. गोरे यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी सुळे आणि पवार यांना पाठवले आहेत. आता याची चौकशी होणार आहे. हे चाललं काय आहे. आपण राजकीय शत्रू नाही, राजकीय विरोधक आहोत, अशाप्रकारे कोणाला जीवनातून उठवणे चुकीचे आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.