छत्रपती शिवाजी महाराजांबाबत (Chhatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) पोलिसांनी काल (दि.24) तेलंगणातून अटक केली. त्यानंतर आज (दि.25) कोरटकरला कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. युक्तिवादावेळी प्रशांत कोरटकरच्या वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे दाखलेही देण्यात आले.
Prashant Koratkar सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं?
पहिल्या दिवसापासून तपासात सहकार्य करणार असे सांगितलेले असताना अटक का असा युक्तीवाद कोरटकर यांचे वकील घाग यांनी केला. तसेच लावलेल्या कलमांमुळे 7 वर्षांच्या आतील शिक्षा होऊ शकते मग अटक का? असा सवालही कोरटकरचे वकील सतीश घाग यांनी युक्तीवाद करताना उपस्थित केला आहे. तर, घटनेचं गांभीर्य मोठं असल्याने अटकेची कारवाई केल्याचे सरकारी वकिलांनी यावेळी सांगितले.
राजमाता जिजाऊंवर शिंतोडे उडवले हा गंभीर गुन्हा असल्याचे वकील असिम सरोदे म्हणाले. तसेच प्रशांत कोरटकरची विधानं गंभीर आहेत. त्यामुळे त्याचे व्हॉइस सॅम्पल घ्यायचे आहे, असं पोलिसांनी कोर्टात सांगितलं. कोरटकरने स्वतः मोबाईल जमा केला नाही तसेच कोरटकरने मोबाईलमधील डेटा डिलीट केल्याची माहितीही तपास अधिका-यांची कोर्टात दिली. याशिवाय आरोपीचा व्हाईस सॅम्पल घ्यायचा असून, महिनाभरापासून तो फरार होता त्यामुळे चौकशीसाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याची मागणीही युक्तिवादावेळी पोलिसांनी कोर्टत केली.
आवाजाचे नमुने जे घ्यायचे आहेत ते शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून घ्यायचे असतात, त्यामध्ये स्वर आणि व्यंजन हे महत्वाचं असतं. आवाज बदलला जाऊ शकतो, मुद्दामून वेगळा काढला जाऊ शकतो, त्यामुळे आरोपीचं वेगवेगळ्या वेळेस व्हर्जन घेणं आवश्यक असल्याचं सरोदे यांनी नमूद केलं.
Prashant Koratkar कोरटकरला कोर्टाबाहेर चप्पल दाखवण्याचा प्रयत्न
कोरटकर प्रकरणावर कोल्हापूर कोर्टात सुनावणी सुरु होती. सुनावणी झाल्यानंतर त्याला कोर्टातून बाहेर आणण्यात आले. त्यानंतर शिवप्रेमी आक्रमक झाल्याचे चित्र आहे. एका शिवप्रेमीकडून कोरटकरला चप्पल दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर, कोर्टात हजर करण्यापूर्वीही परिरात मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी हजर होते. यातील एकजण हातात कोल्हापूरी चप्पल घेऊनच पोलीस स्टेशनबाहेर उभा होता. 9 नंबरचं पायताण मी घेऊन आलोय, ते बरोब्बर कोरटकरच्या गालावर उठावयचं असल्याची आक्रमक भावना यावेळी व्यक्त केली.