बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत ( Sushant Singh Rajput death) याच्या मृत्यूप्रकरणी, केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबई न्यायालयात एक क्लोजर रिपोर्ट सादर (Bollywood) केला आहे, ज्यामध्ये मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे पुष्टी करण्यात आली आहे. सुशांत सिंग राजपूत 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूने हजारो चाहत्यांना धक्का बसला होता. अनेक संशय व्यक्त केले जात होते. ज्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू झाली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन प्रकरणांमध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. राजपूतच्या वडिलांनी त्यांची तत्कालीन प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांवर आत्महत्येस प्रवृत्त करणे, आर्थिक फसवणूक आणि मानसिक छळाचे आरोप केले होते. त्याला उत्तर म्हणून रिया चक्रवर्तीने मुंबईत प्रति तक्रार दाखल केली, ज्यामध्ये सुशांतच्या बहिणींनी त्याच्यासाठी बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन मिळवल्याचा आरोप केला.
सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर केलेले आरोप आणि रियाने सुशांतच्या कुटुंबावर केलेले आरोप या दोन्ही प्रकरणांमध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सीबीआयने सुशांत प्रकरण ताब्यात घेतले आणि तपास सुरू केला. 4 वर्षांच्या तपासानंतर, सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. रिया आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चिट देण्यात आली आहे. सुशांतला कोणीतरी आत्महत्या करण्यास भाग पाडले होते, हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा सीबीआयला सापडला नाही. यामुळे याप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला क्लिनचीट मिळाली आहे.
Sushant Singh Rajput ‘पुराव्यांशी कोणतीही छेडछाड झाली नाही’
सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबाकडे मुंबई न्यायालयात ‘निषेध याचिका’ दाखल करण्याचा पर्याय आहे. सीबीआयने सुशांतच्या आत्महत्येचा तपास एम्सच्या तज्ज्ञांकडून करून घेतला होता. सुशांत आत्महत्या प्रकरणात, एम्सच्या फॉरेन्सिक टीमने कोणताही गैरप्रकार केल्याचा इन्कार केला होता. सोशल मीडिया चॅट्स एमएलएटी द्वारे चौकशीसाठी अमेरिकेला पाठवण्यात आल्या. तपासात असे दिसून आले की, चॅट्समध्ये कोणतीही छेडछाड झाली नाही. रिया चक्रवर्ती ही सुशांतची माजी प्रेयसी होती आणि तिने स्वतः सुशांत आत्महत्या प्रकरणात गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती.