पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत ‘माझ्या पसंतीचे सिडकोचे घर’ ही योजना सिडकोने तब्बल 26,000 घरांची लॉटरी जाहीर करत काढली, मात्र सर्वसामान्यांच्या ही घरे आवाक्याबाहेर (CIDCO housing scam) असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.सिडकोला याच मुद्द्यावर आता मनसेने थेट लक्ष्य करत आंदोलनाची घोषणा केली आहे.
मनसेचे नवी मुंबई शहरप्रमुख गजानन काळे यांनी सांगितले की, 25 मार्च रोजी वाशीमध्ये सिडको आणि घर सोडतधारकांच्या वतीने मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून सिडकोने घरांच्या किंमती कमी कराव्यात आणि LIG वर्गातील घरांना नियमित करावे, अशी ठाम मागणी केली जाणार आहे.
CIDCO housing scam सिडकोवर फसवणुकीचे आरोप
मनसेच्या म्हणण्यानुसार, सिडकोने पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत घरांचे दर ठरवण्यात आले असून, एकाच ठिकाणी असलेल्या घरांच्या किंमतींमध्ये मोठा फरक असल्याचे उघड झाले आहे. सिडकोने जाहीर केलेल्या 322 चौरस फूट घराऐवजी प्रत्यक्षात फक्त 290 चौरस फूटचे घर दिले जात आहे. याशिवाय ट्रक टर्मिनल, बस आगार यासारख्या ठिकाणी घरे बांधून नफा कमवला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्यांना अधिक दराने घरे खरेदी करावी लागत असल्याचे मनसेचे म्हणणे आहे.
CIDCO housing scam मनसेने सिडकोकडे केलेल्या प्रमुख मागण्या
– घरांच्या किंमती तात्काळ कमी कराव्यात
– LIG घर मालकांची घरे नियमित करण्यात यावीत
– योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना मिळावा
सिडकोने याप्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र मनसेच्या आंदोलनामुळे सिडकोवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आता सिडको यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.