संभाजीनगरात औरंगजेबाच्या कबरीभोवती कडेकोट बंदोबस्त; खुलताबादमधील सर्व रस्त्यांवर नाकाबंदी
औरंगजेबाच्या कबरीपर्यंत कोणत्याही बाजूने कोणीही घुसू नये, यासाठी आता प्रशासनाने आणि पुरातत्व विभागाने कबरीच्या मागच्या बाजूच्या मागच्या बाजूला लोखंडी अँगलला उंच लोखंडी पत्रे मारण्यात आले आहेत. मागच्या बाजूने भिंतीवरून कबरीपर्यंत कोणीही पोहोचू नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. आठवडाभरापासून खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीच्या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. खुलताबाद शहरातील सगळ्या रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे.
कोल्हापूर शहरातील परमिट रूम, बार आज बंद
कोल्हापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दरवर्षी परमिट रूम बारच्या लायसन्स नूतनीकरण शुल्कात १० ते १५ टक्क्यांनी वाढ केली जात आहे. फक्त परमिट रूम बारला व्हॅट टॅक्समध्येही दहा टक्के वाढ केलेली आहे. त्यामुळे हॉटेल परमिट रूमधारकांचे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाला जागे करण्यासाठी महाराष्ट्रात परमिट रूम बार आज (गुरुवार) बंद करण्यात येणार आहेत. या बंदला जिल्हा परमिट रूम बार असोसिएशन, हॉटेल मालक संघ, ग्रामीण मद्य व खाद्य विक्रेता असोसिएशन पाठिंबा देणार आहे. तरी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन परमिट रूम असोसिएशनचे अध्यक्ष बाबा निंबाळकर, दयानंद शेट्टी, करण सुतार, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, सिद्धार्थ लाटकर, सचिन शानबाग, राजू जाधव यांनी केले आहे.
औरंगजेब कबरीच्या वादामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये पर्यटकांची संख्या घटली
औरंगजेब कबरीच्या वादाचा परिणाम या भागातील पर्यटनावरही झाला आहे. वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झाली आहे, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक भाविक आणि पर्यटकांनी त्यांचे प्रवासाचे नियोजन रद्द केले आहे.
पुणेकरांना उन्हापासून दिलासा, कमाल तापमानात घट
शहरासह जिल्ह्यात मागील २४ तासात हवामानात झालेल्या बदलामुळे कमाल तापमानात एक ते दोन अंशाने घट झाली.कोरेगांव पार्क येथे ४१ अंशाच्या पुढे गेलेले कमाल तापमान ३९.२ अंश सेल्सिअस तर तळेगांव ढमढरे येथे सर्वाधिक ४०.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस झाल्यामुळे हवामानात बदल झाला. कमाल तापमानात घट झाली असून पुढील दोन दिवस कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नाही असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.