विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. यानंतर या आघाडीतील तिन्ही पक्षांना मोठी गळती लागली आहे. पुढील पाच वर्षे विरोधात राहण्याची या लोकांची तयारी नाही. त्यामु्ळे पक्ष सोडण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. या पक्षांतराचा सर्वाधिक फटका ठाकरे गटाला बसत आहे. आता ठाकरे गटाला धक्का देणारी बातमी कोकणातून आली आहे. आतापर्यंत ठाकरे गटातील नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत होते. परंतु, रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार असलेल्या स्नेहल जगताप अजित पवार (Ajit Pawar) वाटेवर आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महाड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार स्नेहल जगताप लवकरच अजित पवार गटात प्रवेश करतील अशी शक्यता आहे. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी स्नेहल जगताप यांचे काका हनुमंत जगताप आणि पदाधिकारी भेट घेऊन चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर स्नेहल जगताप यांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय होऊ शकतो.
Ajit Pawar कोण आहेत स्नेहल जगताप?
स्नेहल जगताप या दिवंगत माजी आमदार माणिक जगताप यांच्या कन्या आहेत. महाड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. दोन वर्षांपूर्वी स्नेहल जगताप यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भरत गोगावले यांच्या विरोधात तिकीट मिळाले होते. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र स्नेहल जगताप यांना सुनील तटकरेंनी निवडणुकीत मदत केली असा आरोप भरत गोगावले यांनी केला होता. आता याच स्नेहल जगताप सत्ताधारी गटात सहभागी होत आहेत. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar गोगावलेंना शह देण्यासाठी राजकारण
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटात वाद सुरू आहेत. जिल्ह्याचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादीला देण्यास शिंदे गटाने जोरदार विरोध केला आहे. या जिल्ह्यातील अदिती तटकरे आणि भरत गोगावले दोन्हीही मंत्री आहेत. त्यामुळे पालकमंत्रिपद कुणाला द्यायचं याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनाही घेता आलेला नाही. कुणा एकाला जरी मंत्रिपद दिलं तरी दुसरा नाराज होणार आहे. सध्याच्या स्थितीत कुणाचीच नाराजी परवडणार नाही. त्यामुळे या पदाचा निर्णय अजूनही घेतला गेलेला नाही.
यातच आता भरत गोगावलेंना शह देण्यासाठी ही खेळी सुनील तटकरे यांनी खेळल्याचे सांगितले जात आहे. याआधी स्नेहल जगताप यांनी भाजपात प्रवेशासाठीही प्रयत्न केले होते. परंतु, भाजपकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधण्याचा निर्णय घेतला आहे. आज त्यांच्या पक्ष प्रवेशावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.