पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचे 2022 ते 2024 दरम्यान 38 परदेश दौरे झाले असून या दौऱ्यांवर 258 कोटी रुपये खर्च आला असल्याची माहिती सरकारने राज्यसभेत (Rajya Sabha) दिली. या 38 दौऱ्यांपैकी (PM Modi 38 Foreign Trips Cost) सर्वात महागडा दौरा जून 2023 मध्ये अमेरिका दौरा होता ज्यावर 22 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला असल्याची माहिती राज्यसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना सरकारने दिली.
राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात परराष्ट्र राज्यमंत्री पवित्रा मार्गेरिटा (Pavitra Margherita) यांनी गुरुवारी ही माहिती दिली. खरगे यांनी तीन वर्षांत पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांच्या नियोजनासाठी भारतीय दूतावासांनी किती पैसे खर्च केले, असा प्रश्न विचारला होता.
याला उत्तर म्हणून, मार्गेरिटाने 2022, 2023 आणि 2024 मध्ये पंतप्रधानांनी केलेल्या परदेश दौऱ्यांवरील देशनिहाय खर्चाचा डेटा सारणी स्वरूपात शेअर केला. या दौऱ्यांमध्ये अधिकारी, त्यांच्यासोबत सुरक्षा आणि माध्यमांचे प्रतिनिधीमंडळ होते अशी माहिती देखील यावेळी सरकारने दिली.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, जून 2023 मध्ये पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यावर 22,89,68,509 रुपये खर्च झाले होते, तर सप्टेंबर 2024 मध्ये त्याच देशाच्या दौऱ्यावर 15,33,76,348 रुपये खर्च झाले होते. हे आकडे 38 परदेश दौऱ्यांचे आहे. ज्यामध्ये मे 2022 मध्ये जर्मनीपासून डिसेंबर 2024 मध्ये कुवेतच्या दौऱ्यांचा समावेश आहे.
PM Modi कोणत्या दौऱ्यावर किती खर्च
मे 2023 मध्ये पंतप्रधानांच्या जपान दौऱ्याशी संबंधित आकडेवारीनुसार, त्यावर 17,19,33,356 रुपये खर्च झाले, तर मे 2022 मध्ये नेपाळ दौऱ्यावर 80,01,483 रुपये खर्च झाले. या उत्तरात परराष्ट्र राज्यमंत्री पवित्रा मार्गेरिटा यांनी 2014 च्या आधीच्या काही वर्षांचा डेटा देखील शेअर केला आहे.