राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल मोठी घोषणा केली. गोहत्येचा गुन्हा वारंवार केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकाचे गुन्हे वारंवार दाखल होणाऱ्या आरोपींवर या पुढील काळात थेट महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी (मकोका) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी श्रीगोंदा येथील एका घटनेचा उल्लेख केला होता. श्रीगोंदा तालुक्यातील ससाणेनगर येथे फटाके उडविण्याच्या कारणावरून हाणामारीची घटना घडली होती. या घटनेत पोलिसांनी कसा हलगर्जीपणा केला याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली. तसेच गो तस्करीचे प्रकार वारंवार करणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार जगताप यांनी केली होती.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य म्हणाले
या लक्षवेधीला उत्तर देताना पोलिसांनी कोणतीही दिरंगाई केली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस पंधरा मिनिटांत तिथे पोहोचले होते. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेत 15 दिवसांनंतर एका व्यक्तीचा मृत्यू हा खासगी दवाखान्यात झाला आहे. विशेष म्हणजे या घटनेत कोणीही तक्रार दिलेली नव्हती अशी माहिती गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.
आरोपीवर विविध गुन्हे दाखल असून त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे असेही मंत्री भोयर यांनी सांगितले. यावर चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार जगताप यांच्या मागणीला उत्तर दिले. गोहत्येच्या संदर्भात वारंवार गुन्हे दाखल होणाऱ्या आरोपींवर यापुढील काळात थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे आदेश पोलीस दलाला देण्यात येतील असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.