वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship) सामना 11 जून ते 15 जून दरम्यान इंग्लंडमध्ये (India vs England) खेळला जाणार आहे. यानंतर पुढील टप्प्यातील नियोजन सुरू होणार आहे. हा टप्पा जून 2025 पासून 2027 पर्यंत चालणार आहे. या टप्प्याची सुरुवात भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेने होणार आहे. परंतु, याआधी आयसीसीची (ICC) एक बैठक होणार आहे. या बैठकीत आयसीसी मोठा निर्णय घेऊ शकते. या निर्णायाचा परिणाम भारत इंग्लंड मालिकेवरही होऊ शकतो.
एप्रिल महिन्यात होणाऱ्या या बैठकीत बोनस पॉइंट नियमावर चर्चा होणार आहे. या नियमानुसार जागतिक कसोटी चषकात जास्त रँकिंग असणाऱ्या संघांना पराभूत केल्यास जास्त गुण मिळू शकतात. आताच्या नियमानुसार प्रत्येक विजयावर विजयी संघाला 12 गुण मिळतात. जर सामना टाय झाला तर 6 आणि रद्द झाला तर 4 पॉइंट दिले जातात. मीडिया रिपोर्ट्सनुसार आयसीसी आता सामन्यात मोठ्या फरकाने विजयी होणाऱ्या संघाला अतिरिक्त गुण देण्यावर विचार करत आहे.
यासंदर्भातील सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार जेव्हापासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धा सुरू झाली आहे तेव्हापासूनच बोनस गुण देण्याची चर्चा होत आहे. बलाढ्य संघाला पराभूत केल्यानंतर योग्य बक्षीस मिळत नाही अशी काही क्रिकेट संघांचं म्हणणं होतं. त्यामुळे आयसीसीच्या पुढील बैठकीत या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. चर्चेअंती कदाचित निर्णयही घेतला जाऊ शकतो.