राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची (Farmer News) बातमी आहे. खरीप हंगाम 2024 अंतर्गत पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अनुषंगाने नुकसान भरपाई म्हणून 2197.15 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राज्य सरकारने विमा कंपन्यांना निधी वाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात नेली असून, 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होईल, अशी माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.
Farmer News शेतकऱ्यांना वेळेत मिळणार मदत
गेल्या काही महिन्यांपासून पीक विमा भरपाईसाठी शेतकरी प्रतीक्षेत होते. अनेक भागांत अतिवृष्टी व कीड संकटामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. कृषिमंत्री कोकाटे यांनी स्पष्ट केले की, विमा कंपन्यांना निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू असून, वित्त विभागाकडून काहीसा विलंब झाला असला तरी 31 मार्चपूर्वी संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल.
सरकारच्या घोषणेनंतर विरोधकांनी विमा वितरणाच्या विलंबावर टीका केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) आमदार राहुल पाटील यांनी सरकारला लक्ष्य करताना म्हटले, “खरीप हंगामातील पीक विमा ऑगस्ट 2024 मध्ये मिळायला हवा होता. मात्र, सरकारच्या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले.”
Farmer News बँकांच्या भूमिकेवरही संशय
विमा वितरण प्रक्रियेत बँकांकडून होत असलेल्या दिरंगाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी म्हटले, “विमा कंपन्यांकडून मंजूर झालेली रक्कम वेळेवर शेतकऱ्यांना पोहोचत नाही. बँकांकडून त्यावर व्याज घेतले जाते, मात्र शेतकऱ्यांना निधी मिळत नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी.”
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. राज्यातील शेतकरी संघटनांनी सरकारकडून दिलेल्या आश्वासनाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवले असून, पीक विमा भरपाई वेळेत मिळाली नाही तर आंदोलनाचा इशाराही दिला आहे.