भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात शानदार कामगिरी करत टीम इंडियाने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव करत विजेतेपद पटकावले. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियासाठी तिजोरी उघडली आहे. बीसीसीआयने संपूर्ण संघासाठी थोडे थोडके नव्हे तर, तब्बल 58 कोटींचं रोख बक्षीस जाहीर केले आहे. ही रक्कम खेळाडूंसह प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांनाही दिली जाईल. बीसीसीआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे.
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. यानंतर, अंतिम सामन्यातही भारतीय संघानं शानदार कामगिरी करत न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 251 धावा केल्या. यात डॅरिल मिशेलने 63 धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात, भारताने 49 षटकांत लक्ष्य गाठत विजय मिळवला. रोहितने अंतिम सामन्यात 76 धावांची शानदार खेळी केली. तर, श्रेयस अय्यरने 48 धावांचे योगदान दिले.
BCCI बीसीसीआयने नेमकं काय म्हटलं?
बीसीसीआयने बक्षीस जाहीर करणाऱ्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने स्पर्धेत आपले वर्चस्व कायम ठेवले. भारतीय संघ चार दमदार विजयांसह अंतिम फेरीत पोहोचला. संघाने बांग्लादेशविरुद्ध 6 गडी राखून विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध शानदार विजय मिळाला. तसेच न्यूझीलंडला 44 धावांनी हरवून लय कायम ठेवत शेवटी उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचाही 4 गडी राखून पराभव केल्याचे म्हटले आहे.
पुढे बोर्डाने म्हटले आहे की, ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकल्यानंतर टीम इंडियाला 58 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करताना बीसीसीआयला आनंद होत आहे. खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी आणि निवड समितीच्या सदस्यांचा सन्मान करण्यासाठी हे बक्षीस जाहीर केले जात आहे. मात्र, बोर्डाने कोणाला किती पैसे दिले जातील हे उघड केलेले नाही.
BCCI भारताने तिसऱ्यांदा विजेतेपद जिंकले
भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी, सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने 2002 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर पावसामुळे अंतिम सामना होऊ शकला नाही म्हणून भारतीय संघ श्रीलंकेसह संयुक्त विजेता ठरला. यानंतर, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडला हरवून 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर 2025 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने तिसऱ्यांदा या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.