10.6 C
New York

Crime News : नाशिकमध्ये अजित पवार गटाच्या नेत्याची हत्या

Published:

नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Crime News) अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकचे शहर उपाध्यक्ष आणि त्यांच्या भावाची कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्यांचे सख्खे भाऊ प्रशांत जाधव असे हत्या करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

ही घटना उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील बोधलेनगरजवळील आंबेडकरवाडीच्या सार्वजनिक शौचालयासमोर बुधवारी (दि १९) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अचानक करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धक्कादायक म्हणजे, चिमुकल्या मुलासमोरच बापाचा जीव घेतला आहे. हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, रंगपंचमीच्या निमित्ताने जल्लोषाला दिवसभर संपूर्ण शहरात उधाण आलेले होते. रात्री शहर झोपी जात असताना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे महामार्गाला लागून असलेल्या आंबेडकरवाडीमध्ये एका सार्वजनिक शौचालयासमोर कोयतेधारी हल्लेखोरांनी जाधव बंधुवर जोरदार हल्ला केला. एकापेक्षा अधिक वार केल्याने रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात दोघे कोसळले.

परिसरातील तरुणांनी तातडीने दोघांना शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. अतिरक्त रक्तस्त्राव झाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात मोठ्या संख्येने गर्दी झाली होती.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे . याबाबत उप नगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तसेच संशयित हल्लेखोर यांच्या मागावर चार पथके रवाना करण्यात आली आहेत. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी आर्थिक वादातून हा हल्ला झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Crime News नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढतेय

नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून खून, हाणामाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटना वाढत चालल्या आहेत. यामुळे नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे, असेच चित्र दिसत आहे. खून आणि गुन्‍हेगारीचे प्रकार नित्याचे झाले आहेत, अशी नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. दुहेरी हत्येमुळे संपूर्ण शहरात मोठा तणाव निर्माण झाला असून, पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img