10.3 C
New York

Ambadas Danve : सत्ताधाऱ्यांच्या विश्वासदर्शक ठरावावर दानवे आक्रमक

Published:

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी विरोधकांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची सूचना दाखल केली होती. मात्र विरोधकांचा प्रस्ताव सभापती राम शिंदे यांनी मंगळवारी (18 मार्च) फेटाळून लावला. मात्र आज (19 मार्च) सत्ताधाऱ्यांनी नीलम गोऱ्हे यांच्याबाबत मांडलेला विश्वासदर्शक ठराव राम शिंदे यांनी मंजूर करून घेतला. त्यामुळे विरोधक आज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. याचवेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी विरोधकांना बोलू दिले जाणार नसेल तर सभात्याग करू, असा थेट इशारा सभागृहात दिला.

भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी नीलम गोऱ्हेंबाबत विश्वासाचा प्रस्ताव सभागृहात मांडला आणि त्यांचा प्रस्ताव बहुमताने पास झाला. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. जवळपास तासभर विरोधकांनी घोषणाबाजी केली. विरोधकांच्या घोषणाबाजीत सभागृहाचे कामकाज सुरू होते. त्यानंतर 10 मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. यानंतर विरोधकांना बोलण्याची संधी देण्यात आली. यावेळी अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावावर संताप व्यक्त केला.

अंबादास दानवे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांकडे बहुमत आहे. त्यामुळे ते प्रस्ताव मांडू शकतात आणि पारितही करून घेऊ शकतात. मात्र, याबाबत विरोधी पक्षांचे म्हणणे काय? आम्ही अविश्वास प्रस्ताव का मांडत होतो? आमची बाजू मांडण्याची संधी आम्हाला मिळायला हवी. आम्ही प्रस्ताव सादर केल्यानंतर 15 दिवसांची मुदत होती. मात्र, सरकारने अचानक विश्वासदर्शक ठराव मांडत तो कोणत्या कायद्याच्या आधारे मंजूर करून घेतला? असा संतप्त सवालही दानवे यांनी यावेळी विचारला.

अंबादास दानवे म्हणाले की, बहुमत असल्याने सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव मंजूर होणार यात काही वाद नाही. मात्र, विरोधकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी हवी. सभागृहात विरोधी पक्षांचे सदस्य यावर आवाज उठवत होते. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सभापती कोणत्याही पक्षाचे नसतात. मात्र, सभापती एखाद्या पक्षाच्या पदाधिकऱ्यांप्रमाणे काम करत आहेत. सर्व सदस्यांना न्याय देणारी त्यांची भूमिका असायला हवी. परंतु कोणतीही चर्चा न करता असा प्रस्ताव आणलाय कसा? यामध्ये अधिकारही दोषी आहेत? हे नियमात बसते का? याचे उत्तर अधिकाऱ्यांना द्यावे लागेल, असे म्हणत दानवे यांनी सभागृहाच्या कामकाजावर संताप व्यक्त केला.

Ambadas Danve एकांगी पद्धतीने सभागृहाचे कामकाज चालवण्याचा प्रयत्न

अंबादास दानवे म्हणाले की, विश्वासदर्शक ठराव सत्ताधाऱ्यांना मांडायचा असेल तर त्यांनी जरूर मांडावा. आमचा त्याला विरोध नाही. मात्र, ते कार्यक्रमपत्रिकेत येऊ द्या. त्यावर चर्चा होत नाही, असे सभागृहात चालणार नाही. सभागृहाचा, विरोधी पक्षांचा आणि सदस्यांचा सातत्याने अवमान होत आहे. सरकारला मस्ती आणि मुजोरी आली असून पाशवी बहुमताचा ते गैरवापर करत आहेत. सभागृहात प्रश्नही त्यांचे, लक्षवेधीही त्यांचीच आणि मंत्रीही त्यांच्यात प्रश्नांना उत्तरे देणार असतील, विरोधी पक्षांना बोलण्याची संधीच मिळणार नसेल तर काय उपयोग? सर्वाधिक लक्षवेधी सत्ताधारी पक्षाच्या आहेत. एकांगी पद्धतीने सभागृहाचे कामकाज चालवण्याचा सभापती आणि तालिका सभापतींकडून प्रयत्न होत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला.

Ambadas Danve दरेकरांनी कोणत्या नियमाच्या आधारे ठराव मांडला?

आम्ही मांडलेल्या प्रस्तावाचे काय झाले? प्रवीण दरेकर यांनी कोणत्या नियमाच्या आधारे ठराव मांडला? असे प्रश्न उपस्थित करत अंबादास दानवे यांनी याचे समाधानकराक उत्तर द्यावे, अशी मागणी केली. तसेच सभागृहात विरोधकांना बोलू दिले जाणार नसेल, तर आम्ही सभात्याग करू, कोणत्याही कामकाजात सहभागी होणार नाही, असा इशारा देखील अंबादास दानवे यांनी यावेळी दिला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img