नागपुरात सोमवारी झालेल्या दंगलीवरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठा दावा केला आहे. नागपुरात बाहेरून लोक आली नव्हती. दोन दिवस झाले विश्व हिंदू परिषद, बजरंग दल भडकवणारी वक्तव्ये करत आहेत. हिंदूंना भडकविण्यासाठी आधी हिंदूंवर हल्ले केले जातात. हा एक नवीन पॅटर्न निर्माण केला आहे. राज्यात आणि देशात दंगली पेटवून 2029 च्या निवडणुकीला समोरे जायचे. हा नवीन पॅटर्न निर्माण झाला आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
‘बाबरीची पुनरावृत्ती करायची असेल, तर हीच ती वेळ आहे,’ असे विधान मंत्री नितेश राणे यांनी केले होते. याचाही समाचार खासदार राऊत यांनी घेतला आहे. सरकार तुमचे आहे. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस तुमचे आहेत. मग दंगली कशाला करता? सरकारने औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करून टाकावी, असे आव्हान खासदार राऊत यांनी दिले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
Sanjay Raut औरंगजेबाची ढाल करून काहीजण हिंदू-मुस्लीम दंगे पेटवत आहेत
संजय राऊत म्हणाले, “दंगली का पेटवल्या जात आहेत? हा महाराष्ट्रातील संशोधनाचा विषय आहे. होळीसारख्या सणाला महाराष्ट्रात दंगली उसळल्या नव्हत्या. उद्या गुढीपाडव्याला सुद्धा दंगली उसळण्याचा प्रयत्न करतील. औरंगजेबाची ढाल करून काहीजण हिंदू-मुस्लीम दंगे पेटवत आहेत. बाबरीचे उदाहरण देत आहेत. बाबरीप्रमाणे औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू सांगतात. सरकार तुमचे आहे. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस तुमचे आहेत. मग दंगली कशाला करता? सरकारने औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करून टाकावी.”
Sanjay Raut औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे प्रतिक आहे
“मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदाद पवार यांनी कुदळ, फावडे घेऊन कबरीपशी जावे आणि त्यांच्या लोकांच्या इच्छा पूर्ण कराव्यात. औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे प्रतिक आहे. औरंगाजेब, अफजलखान, शायिस्तेखान महाराष्ट्रात आले आणि परत गेले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाची कबर इथेच खांदली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे महत्त्व कमी करायचे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपची विचारधारा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे भाजपच्या शौर्याचे प्रतिक कधीच नव्हते आणि नाही. आधी व्हिलन संपवला की हिरो आपोआप संपते. त्यामुळे व्हिलनवर हल्ला करून महाराष्ट्राच्या हिरोंना संपवण्याची भूमिका संघ आणि भाजपची आहे. जनतेने यापासून सावध राहिले पाहिजे,” असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.
Sanjay Raut बाळासाहेब ठाकरे हिंदुत्त्वाचा लढा हा राममंदिराचा होता
“बाळासाहेब ठाकरे यांचे स्पष्ट मत होते, ‘आम्हाला एक बाबरी द्या. बाकी सगळ्या मशिदी आणि कबरी तुमच्या आहेत. आम्ही तिकडे ढुंकूनही पाहणार नाही. फक्त अयोध्येत श्री रामाचे मंदिर उभे करू. ते सुद्धा जिथे अतिक्रमण झाले, त्याजागी. देशात हिंदू-मुस्लिमांनी सामंजस्याने राहिले पाहिजे. तरच हे राज्य आणि देश टिकेल.’ ही बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. बाळासाहेब ठाकरे हिंदुत्त्वाचा लढा हा राममंदिराचा होता. त्यासाठी आम्ही बाबरीचे पतन केले,” असे संजय राऊत यांनी सांगितले.
Sanjay Raut …तर फडणवीस गृहमंत्री म्हणून अपयशी
‘बाहेरून आलेल्या काही लोकांनी लोकांची घरे पेटवली. या लोकांनी टिपून दगडफेक केली,’ असा दावा भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी केला होता. यावर संजय राऊत म्हणाले, “हे शक्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात बाहेरून येऊन लोक दंगा पेटवत आहेत, जाळपोळ होतीय, तर ते गृहमंत्री म्हणून अपयशी आहेत. अधिवेशनात मुख्यमंत्री कायदा आणि सुव्यवस्थेवरून गर्जना करत आहेत. दोन दिवस झाले विश्व हिंदू परिषद, बजरंग दल भडकवणारी वक्तव्ये करत आहेत. इथे बाहेरून आलेली नाही. हे चेहरे मुख्यमंत्र्यांना माहिती असतील.”
Sanjay Raut हिंदूंना भडकवण्यासाठी हिंदूंवर हल्ले
“हिंदूंना भडकविण्यासाठी आधी हिंदूंवर हल्ले केले जातात. हा एक नवीन पॅटर्न निर्माण केला आहे. कुणाची हिंमत आहे मुंबई आणि नागपुरात अशाप्रकारे काम करायची? आधी हिंदूंच्या डोक्यात भय निर्माण केले जाते. त्यांच्यावर हल्ले करायचे आणि त्यांना दंग्यांसाठी प्रवृत्त करायचे. मग राज्यात आणि देशात दंगली पेटवून 2029 च्या निवडणुकीला समोरे जायचे. हा नवीन पॅटर्न निर्माण झाला आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.