औरंगजेबाच्या कबरीवरुन महाराष्ट्रासह देशात राजकारण पेटले आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आज राज्यभरात जिल्हा परिषद आणि तहसील कार्यालयांसमोर आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडून फडणवीस सरकारसह हिंदुत्ववादी संघटनांवर निशाणा साधण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या ताब्यात औरंगजेबाची कबर आहे आणि राज्य सरकारने कबरीला संरक्षण दिले आहे. सरकारने आदेश काढावा असे आव्हानच त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिले.
आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंत आहे. यानिमित्ताने भिवंडी येथील शिवक्षेत्र मराडे पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी महाराजांचे आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. देव, देश आणि धर्मरक्षणासाठी ज्यांनी सर्वसामान्यांमध्ये प्राण ओतले आणि सर्वांच्या कल्याणासाठी रयतेचे राज्य निर्माण केले अशा युगपुरुषाला आपल्या, आराध्याला नमन करणे नवी ऊर्जा प्रदान करणारे होते. हे मंदिर सर्व शिवप्रेमींना स्वराज्याच्या जाज्वल्य मूल्यांप्रती सदैव जागृत राहण्यासाठी प्रेरित करत राहील हा विश्वास असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
काँग्रेसला मोठा धक्का, पुण्यात सरचिटणीसांसह 100 पदाधिकारी देणार राजीनामा
यावेळी जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले की, ‘औरंगजेबाची कबर कशाला हवी, पण औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारच्या एएसआयने (भारतीय पुरातत्व विभाग) पन्नास वर्षांपूर्वी संरक्षण दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला देखील तिथे संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे. काय दुर्दैव आहे आम्हाला तिथे संरक्षण द्यावे लागत आहे. मात्र महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडण कधीच होऊ देणार नाही,’ असे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी जाहीरपणे म्हटले आहे.