कॉंग्रेस (Congress) नेते नाना पटोले यांनी काल अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना होळीच्या सणाच्या निमित्ताने मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. यावर आज कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्याकडे या आणि मुख्यमंत्री व्हा, असं नाना पटोलेंनी (Nana Patole) म्हटलं होतं. तर आम्ही तुम्हाला आलटून-पालटून मुख्यमंत्री करू, असं देखील पटोले म्हणाले होते.
नाना पटोले यांच्या या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, नाना पटोले यांनी काय ऑफर दिली हे मी माध्यमातून पाहिलं. राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो, शत्रूही नसतो. वेळेप्रमाणे राजकारण (Maharashtra Politics) चालते, त्यामुळे उद्या काय वाढून ठेवले आहे हे आता सांगता येत नाही. यांची आत्ताची ओढाताण पाहता पुढे काय होईल? हे सांगणं कठीण आहे. मात्र नाना पटोले यांनी घाई केली, एवढेच माझं म्हणणं आहे, असं कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटलंय.
जयंत पवार पक्षात नाराज? शरद पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट
यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र क्रमांक एकवर गेलाय. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची आवश्यकता आहे, कर्जात शेतकरी बुडाला आहे, शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे कर्जमाफी मिळाली पाहिजे. वाटल्यास त्यासाठी कर्ज काढा, मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, अशी मागणी देखील वडेट्टीवारांनी केलीय.
मंत्री कोकाटे यांच्यासंदर्भात न्यायालयाच्या निरीक्षणावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, न्यायालय असं बोलायला लागलं तर कसं होईल? उद्या एखाद्याने खून केला तर त्याला शिक्षा देताना कोर्ट असेच तर्क मांडणार का? असा आमचा प्रश्न आहे. कुठलाही गुन्हेगार असेल आणि तो शिक्षेस पात्र असेल, तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. निवडणुकीचा खर्च वाढणार आहे, म्हणून आम्ही त्याला माफ करतो. न्यायालयाची अशी भूमिका हास्यास्पद आहे. न्यायालय असं वागणार असेल, तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी, असा प्रश्न देखील वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय.