13.3 C
New York

Heat Wave : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा…

Published:

होळीनंतर राज्यातील उकाड्यात वाढ होत जाते, (Heat Wave) असा एक सर्वसाधारण अनुभव, अंदाज आहे. मात्र, यंदा होळीच्या आधीपासूनच राज्यात उष्णतेचा तडाखा जाणवतो आहे. आता तर विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून तेथील पारा 40 अंशांच्या नजीक पोहोचला आहे. ब्रह्मपुरीमध्ये 42 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर कोकण पट्ट्यामध्ये देखील तापमानवाढ झाल्याचे समोर आले आहे. पुढील 24 तासांमध्ये ही स्थिती कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. चंद्रपूर, अकोला, नागपूर, वर्धा येथे कमाल तापमानात 1 ते 2 अंशांची वाढ अपेक्षित आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही उकाडा चांगलाच वाढला असून दुपारी घराबाहेर पडणे नागरिकांच्या जीवावर येत आहे. भर उन्हात घराबाहेर न पडण्याचा इशारा यंत्रणा देखील देत आहेत. उत्तर महाराष्ट्र याला काही प्रमाणात अपवाद असून, येथे अद्यापही पहाटेच्या वेळी काहीसा गारठा जाणवतो आहे. दिवस माथ्यावर आल्यानंतर मात्र हा गारठा नाहीसा होऊन तपमान वाढीने नागरिक त्रस्त होत आहेत.

विदर्भासह राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तपमान चांगलेच वाढते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपुरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. रविवार (16 मार्च) रोजी अकोल्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. दुसरीकडे विदर्भातील जवळजवळ सर्व जिल्ह्यांतील उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. उष्णतेची संभाव्य लाट लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Heat Wave उष्णतेने शहरे तापली

नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यांमधील तपमान हे 40 डिग्रीच्या पार पोहोचले आहे. (15 मार्च) विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपुरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर चंद्रपूर (41.4), ब्रम्हपुरी (41.2) आणि वर्धा येथ 41 डिग्री सेल्सियस इतके तापमान नोंदविण्यात आले आहे. आगामी काळात हेच तापमान 3 ते 4 डिग्रीने वाढणार असल्याचा अंदाज आहे. मार्च महिन्याच्या शेवटी विदर्भातील तपमान हे साधारण 35 अंशांच्या पलीकडे जात असतं. मात्र, यंदा हे सगळेच समज खोटे ठरले आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तपमानाने सामान्यपेक्षा अधिक पारा गाठल्याने आगामी काळात उष्णतेने शहर आणखी तापण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आगामी काळासाठी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

24 तासांतील हवामानाचा आढावा घेतल्यास शुक्रवारी एकाएकी सायंकाळच्या वेळी पावसाची सुरुवात झाली आणि परिणामस्वरुप राजस्थान, मध्य प्रदेश आणि दिल्लीमध्ये काही अंशी तापमानात घट नोंदवण्यात आली. ओडिशा, मध्य प्रदेश, गुजरात या भागांमध्ये 14 ते 18 मार्चदरम्यान पुन्हा एकदा उष्णता वाढण्यास सुरुवात होईल असा इशारा हवामान विभागाने जारी केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img