राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीमध्ये (Mahayuti) काहींना काही कारणांवरून धुसफूस सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये नाशिक (Nashik) आणि रायगडच्या (Raigad) पालकमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत वाद होत असून पालकमंत्री पदावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज देखील असल्याची चर्चा सुरु आहे. तर आता पुन्हा एकदा महायुतीमध्ये नाराजी असल्याचं सांगण्यात येत आहे.
नुकतंच अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 2025-26 साठी अर्थसंकल्प सादर केला आहे. मात्र या अर्थसंकल्पात शिवसेनेच्या मंत्र्यांना कमी निधी देण्यात आला असा आरोप शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजप (BJP) देखील अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. माहितीनुसार, भाजपकडील आदिवासी विकास विभागात निधी कमी मिळाल्याने नाराजी पसरली आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी अर्थ मंत्रालयाने 36 हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याने त्याचा फटका सर्व खात्यांना बसला आहे. भाजपकडे असणाऱ्या खात्यांना जास्त निधी देण्यात आले आहे तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणाऱ्या खात्यांना निधी मिळाला आहे तर सर्वात कमी निधी शिंदे गटाला देण्यात आले आहे. या अर्थसंकल्पात भाजपला 89 हजार 128 कोटी निधी देण्यात आला आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 56 हजार 563 कोटींचा निधी दिला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेला 41 हजार 606 कोटींचा निधी मिळाला आहे. नगरविकास खात्याला तब्बल 10 हजार कोटींची कपात करण्यात आल्याने शिंदे गट नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
माहितीनुसार, सामाजिक न्याय विभागाचा 3 हजार कोटी रुपयांचा निधी आणि आदिवासी विकास विभागाचा 4 हजार कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी देण्यात आले आहे. त्यामुळे आता शिवसेनेनंतर भाजप देखील नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री शिरसाट यांनी नाराजी व्यक्त करत आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी अशा प्रकारे वळवता येत नाही. असं म्हटले आहे. तर दुसरीकडे राज्य सरकार लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून विरोधक या मुद्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे.