राज्यातील स्पर्धा परिक्षांचा अभ्यास (MPSC Exams) करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. एमपीएससी संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलीय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) या संदर्भात एक विशेष घोषणा केलीय. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीमध्येच राज्य सरकार घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
सध्या राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. ते विविध मुद्द्यांनी गाजतंय. अशातच काल विधान परिषदेमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगासंदर्भातील विविध मुद्द्यांवर देखील चर्चा (MPSC Exams In Marathi) झालीय. यावेळी विधानपरिषदेचे सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससी परीक्षा मराठीमध्ये घेण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. आमदार नार्वेकर यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय.
मुंबईत होळीनिमित्त पोलिसांचा कडक बंदोबस्त, नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात एक्स सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटलंय की, विधानपरिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससीच्या परीक्षा मराठीत घेण्यासंदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला होता. अभियांत्रिकी आणि कृषी तांत्रिक पदांच्या परीक्षा सध्या इंग्रजीमध्ये घेतल्या जातात, कारण यासंबंधित पुस्तके मराठी भाषेत उपलब्ध नाहीत. परंतु, आता अभियांत्रिकी शिक्षण मराठीमध्ये घेण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच या अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीमध्ये उपलब्ध होतील. यानुसार, सर्व तांत्रिक पदांच्या परीक्षा मराठीमध्येचं घेण्याचं नियोजन राज्य शासनाने केलंय.
तलाठी भरतीसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तलाठी तसेच जिल्हा परिषदेतील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जात नाहीत. तसेच नियुक्ती पत्र देण्याची कार्यवाही देखील आयोगामार्फत केली जात नाही. त्यामुळे या विषयांचा आयोगाच्या मनुष्यबळाशी कोणताही संबंध नसल्याचं देखील फडणवीसांनी स्पष्ट केलंय.