साताऱ्यातील जयकुमार गोरे या मंत्र्याने झुंडशाहीचा कहर केला आहे. सत्ता आणि पोलिसी बळाचा गैरवापर करून गोरे यांनी स्थानिक पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करून अटक करायला भाग पाडले. टिळक, आगरकर, जांभेकर, आचार्य अत्रे यांच्या पत्रकारितेचा वारसा सांगणारा हा आपला महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्रात सत्य सांगितल्याबद्दल एका तरुण पत्रकाराला मंत्र्याकडून सुडाने तुरुंगात ढकलले जात असेल तर हे राज्य शिवरायांचे नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे झाले हे मानायला हवे. मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांवर अशाच सुडाच्या कारवाया देशात सुरू आहेत. व्यंगचित्रकार, पत्रकार, लेखक मंडळी त्यामुळे दहशतीखाली आहेत. महाराष्ट्रातही आता तोच दळभद्री प्रकार सुरू झाला आहे, असा हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. (Uddhav Thackeray attacks the government regarding Jayakumar Gore)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तरीही राज्यातील अनेक गावगुंड त्यांच्या मंत्रिमंडळात असून कायदा आणि पोलीस या ‘आकां’च्या कोठीवर नाचत आहे काय? असा प्रश्न जनतेला पडला आहे. पोलिसांचा हा असा मुक्त गैरवापर महाराष्ट्रात जागोजाग सुरू आहे आणि ते लोण आता स्वातंत्र्यलढ्यात पुढे असलेल्या छत्रपतींच्या साताऱ्यात पोहोचले. गोरे यांचे वागणे हे बीडच्या वाल्मीक कराडप्रमाणे आहे आणि हे कराड थेट सत्तेत आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून केली आहे.
पुरावे नसेल तर कारवाई, जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय
साताऱ्याच्या एका घरंदाज महिलेने जयकुमार गोरे यांच्या संदर्भात पोलीस आणि राजभवनात तक्रार केली. गोरे यांनी आपल्याला मोबाईलवर स्वतःचे नग्न फोटो पाठवून एक प्रकारे विनयभंगच केला, असे ती महिला म्हणते. ती महिला कोर्टात गेली तेव्हा गोरे यांनी कोर्टात साष्टांग दंडवत घालून माफी मागितली आणि खटला मागे घेण्याची विनवणी केली. यापुढे पुन्हा त्रास देणार नाही, असा शब्द दिल्यावर त्या महिलेने खटला मागे घेतला. याचा अर्थ या विनयभंग प्रकरणातून जयकुमार गोरे निर्दोष सुटले असा होत नाही. कोर्टाच्या आदेशात गोरे निर्दोष आहेत असे म्हटले नसताना गोरे यांनी विधानसभेत आपण या प्रकरणात निर्दोष सुटल्याचे खोटेच सांगून सार्वभौम सभागृहाची दिशाभूल केली आणि त्याबद्दल गोरे यांच्यावरच हक्कभंगाचा खटला चालवायला हवा, असे त्यांनी म्हटले आहे.
ही महिला 17 मार्चला राजभवनासमोर उपोषणाला बसणार आहे. कारण गोरे यांनी त्या महिलेचा छळ चालूच ठेवला. गोरे यांना लाथ मारून मंत्रिमंडळातून हाकलून द्यावे असे हे प्रकरण आहे, पण महाराष्ट्रात उलटेच घडले. गोरे यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करून पत्रकारावर खंडणी, विनयभंग, अॅट्रॉसिटी असे गुन्हे लावले आणि त्याला अटक करायला भाग पाडले. गोरे यांच्या सरकार पुरस्कृत झुंडशाहीस मुख्यमंत्री फडणवीस यांची मान्यता आहे काय? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.