ज्या योजनेमुळे महायुतीचे सरकार विक्रमी बहुमताने पुन्हा सत्तेत आले, ती लाडकी बहीण योजना Ladki Bahin Yojana सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलीच गाजते आहे. निवडणुकीत दिलेल्या 2100 रुपयांच्या आश्वासनाची पूर्तता कधी होणार, याची विचारणा विरोधकांकडून सातत्याने होत होती. मात्र, अर्थसंकल्प सादर झाल्यापासून तर याबाबत विरोधक चांगलेच आक्रमक झालेले दिसतात. बुधवारी देखील सभागृहात हा मुद्दा गाजला. या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार? याच अधिवेशनात 1500 रुपयांचे 2100 रुपये करणार का असा सवाल महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंना केला? यावर अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नसल्याचे म्हटले आहे. मात्र, या मुद्द्यावरून विरोधकांनी काही काळ सभात्याग केला. (mukhyamantri majhi ladki bahin yojana rohit pawar and varun sardesai question to aditi tatkare over 2100 rupees)
अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले, पण त्यांना मानधन मिळाले नसल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. याशिवाय नमो शेतकरी कृषी सन्मान आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही वेगळी ठेवावी. लाडक्या बहिणींचा 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये कधी करणार, या अधिवेशनात तो होईल का, याचं मुद्द्याला धरून उत्तर द्या, असं रोहित पवार म्हणाले. तुम्हाला कृषी योजनेतील लाभार्थ्यांची संख्या माहीत असतानाही तुम्ही त्यांना निवडणूक काळात पैसे दिले मात्र आता त्यांना देत नाही याचा अर्थ निवडणुकीसाठी त्याचा वापर केला का, असा सवाल रोहित पवार यांनी केला.
‘माझ्यावर विश्वास ठेवू नका…’, असं का म्हणाले जयंत पाटील यांचा रोख काय?
यावर उत्तर देताना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 26 जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकांना इन्सेटिव्ह देण्याच्या संदर्भात प्रक्रिया सुरु आहे, असं म्हटलं. नमो शेतकरी योजनेतून 1 हजार रुपये मिळतात. लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय पाहिला तर त्यात नमूद केलं आहे की 1500 पेक्षा जास्त लाभ घेता येणार नाही. त्यामुळे त्यांना वरचे 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून देत आहे. जो आकडा कमी झाला तो विभागाने दिला नसल्याचे अदिती तटकरेंनी सांगितले.
आमदार वरुण सरदेसाई यांनी लाडक्या बहिणींना निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर किती महिलांना लाभ दिला असा सवाल केला. याशिवाय लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार की नाही हे सांगा असा प्रश्न विचारला. यावर अदिती तटकरे म्हणाल्या की ऑक्टोबर – 2024 मध्ये 2 कोटी 33 लाख 64 हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम देण्यात आली. तर, फेब्रुवारी 2025 मध्ये 2 कोटी 47 लाख महिलांना लाभ देण्यात आला, असे तटकरेंनी सांगितले.
मात्र, 2100 रुपयांच्या या मुद्द्यावर पवार आणि सरदेसाई आक्रमक झाले. या अधिवेशनात ते देणार की नाही, हे सांगा, अशी मागणी त्यांनी केली. यावर अदिती तटकरे यांनी आम्ही लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही, याचे आश्वासन देत 2100 रुपयांसंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री आणि दोन ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील, असेही त्या म्हणाल्या.