भारतीय जनता पक्षाचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता आणि भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी खोक्या उर्फ सतीश भोसले याला अखेर अटक झाली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून त्याला पकडण्यात आले आहे. त्याला ट्रांझिट रिमांडवर उद्यापर्यंत (13 मार्च) बीडमध्ये आणले जाणार असल्याचे बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितले आहे. त्यावर आमदार सुरेश धस म्हणाले की, ‘अत्यंत चांगली बाब आहे. त्याने जी चूक केली आहे. त्यासंदर्भात त्याला अटक झाली आहे. आता कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल.’
खोक्या भोसले उर्फ सतीश भोसले याच्या अटकेनंतर सुरेश धस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘त्याने जी चूक केली त्यानुसार त्याच्यावर कारवाई झाली आहे. मी कोणत्याही पोलिसांना फोन केलेला नाही. अजिबात नाही. मी कोणत्याही पोलिसाला फोन करत नाही. खोक्याला अटक करा, असं मी म्हटलं. त्याने चूक केली असेल तर त्याच्यावर कारवाई करा, असं मी पहिलेच म्हटलं होतं. आता त्याच्यावर कारवाई झाली आहे. जे त्याच्यावर कलमं लागले आहेत. त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल.’ असंही आमदार सुरेश धस म्हणाले. ते विधीमंडळ परिसरात माध्यमांसोबत बोलत होते.
Suresh Dhas खोक्याचा आका मला माहित नाही…
खोक्याचा बोक्याही सापडला पाहिजे, असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. त्यावर सुरेश धस म्हणाले की, खोक्याचा बोका, आका, सगळे पोलिसांनी शोधावे आणि त्यांना आत घालावे. खोक्याचा आका कोण आहे, या प्रश्नावर त्यांनी त्याची माहिती मला नसल्याचे म्हटले आहे.
Suresh Dhas माजी मंत्र्यांना सुरेश धसांचे आव्हान
धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांनी खोक्या उर्फ सतीश भोसले प्रकरणात आमदार सुरेश धस यांना सह आरोपी करण्याची मागणी केली, असं कोणालाही सहआरोपी करता येतं काय़? हा काय भाजीपाला आहे का, असा खोचक सवाल धसांनी यावेळी केला. ते म्हणाले की, अजय मुंडे फार लहान आहे. माझं धनंजय मुंडे यांना सांगणं आहे की, याला त्याला बोलायला लावण्यापेक्षा तुम्ही बोला. धनंजय मुंडे बोलल्यानंतर मी उत्तर देईल, असे आव्हानच त्यांनी माजी मंत्र्यांना दिले आहे. धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद गेल्यानंतर आमदार प्रकाश सोळंके, आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या संबंधीचे व्हिडिओ बाहेर येत आहेत, असाही आरोप सुरेश धसांनी केला. धनंजय मुंडे यांनी स्वतः समोर येऊन बोलावं, असं आव्हानच आमदार सुरेश धसांनी दिले आहे.