गेल्यावर्षी विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी अर्थसंकल्पात हात एकदम सैल सोडला होता. त्या सैल हातांच्या ओंजळीत भरभरून मते मिळाली. त्यांचा कार्यभाग साध्य झाला आणि मग सत्तेत बसल्यानंतरच्या पहिल्यावहिल्या अर्थसंकल्पात या मंडळींनी हातच वर केले. कोणाच्या पदरात काहीच टाकले नाही. हे अपेक्षितच होते. पहिल्याच अर्थसंकल्पात आपला खरा चेहरा दाखवला, अशी घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी केली आहे. (Thackeray’s attack on the Mahayuti)
आधी दिलेली आश्वासने आणि पाच वर्षांत करायची नवी कामे याची विद्यमान सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने नोंद त्यात दिसेल, अशी जनतेची भाबडी अपेक्षा होती. मात्र पहिल्याच अर्थसंकल्पात राज्यकर्त्यांनी त्यांच्या ‘गरज सरो वैद्य मरो’ या मानसिकतेचे दर्शन घडविले. राज्यातील जनतेच्या पदरात तर काही टाकले नाहीच, परंतु शेतकरी आणि लाडक्या बहिणींच्याही तोंडाला पाने पुसण्याचा कृतघ्नपणा केला, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखातून केली आहे.
महाराष्ट्रात उष्णतेची मोठी लाट; ‘या’ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना शेतकरी आणि त्यांच्या लाडक्या बहिणींचे विस्मरण झाले. शेतकरी हा आपला पोशिंदा असे ते जरूर म्हणाले, परंतु कृषी क्षेत्रासाठी नेहमीच्या योजना आणि त्यासाठी 9 हजार 710 कोटींची तरतूद यापलीकडे बळीराजाच्या ओंजळीत त्यांनी काहीच टाकले नाही. दिवसा वीज देऊ आणि पुढील पाच वर्षांत विजेचे दर स्वस्त करू असे गाजर त्यांनी दाखवले, असे त्यांनी म्हटले आहे
‘एआय’ वापरासाठी धोरण कृषी क्षेत्रात आखण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले. ‘एआय’ हे अत्याधुनिक तंत्रज्ञान असल्याने ते जरूर वापरा, परंतु शेतकऱ्यांच्या गळ्यात पडलेला कर्जाचा फास तसाच ठेवायचा, त्याच्या संपूर्ण कर्जमाफीबद्दल अवाक्षरही काढायचे नाही आणि वर त्यांना पोशिंदा म्हणायचे. हे ढोंग असल्याचा हल्लाबोल या अग्रलेखात करण्यात आला आहे.
अशीच पाने अर्थमंत्र्यांनी ‘लाडक्या बहिणीं’च्या तोंडालाही पुसली. 2100 रुपये दरमहा लाडक्या बहिणींना देण्याचा शब्द त्यांच्याच सरकारने दिला होता. अर्थसंकल्पात त्या आश्वासनालाही हरताळ फासण्यात आला. त्याऐवजी महिलांना आम्ही ‘लखपती’ बनविणार असे एक नवीन पिल्लू अर्थमंत्र्यांनी सोडल्याचा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.