दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर (Delhi Assembly Elections 2025) माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे. दिल्लीतील एका न्यायालयाने आज केजरीवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. माहितीनुसार, न्यायालयाने केजरीवाल आणि इतरांविरुद्ध सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. तर या प्रकरणात न्यायालयाने दिल्ली पोलिसांकडून 18 मार्चपर्यंत अहवाल मागितला आहे.
Arvind Kejriwal नेमकं प्रकरण काय?
2019 च्या एका प्रकरणात न्यायालयाने केजरीवाल आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. अरविंद केजरीवाल, तत्कालीन मटिला आमदार गुलाब सिंह आणि द्वारका नगरसेवक नीतिका शर्मा यांच्याविरुद्ध मोठे होर्डिंग लावल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली होती, जी राऊस अव्हेन्यू कोर्टाने स्वीकारली. तक्रारीत त्या सर्वांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.
तर आज या प्रकरणात सुनावणी करताना न्यायालयाने केजरीवाल आणि इतरांविरुद्ध सार्वजनिक पैशाचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने पोलिसांना 18 मार्चपर्यंत कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.
तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांच्याविरुद्ध हरियाणातील शाहबाद पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. दिल्ली विधानसभा निवडणुकीत हरियाणावर यमुना नदीच्या पाण्यात ‘विष’ मिसळल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता.