मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंगेच्या पाण्यावरून चांगलंच फटकारलं होतं. श्रद्धेलाही मर्यादा असली पाहिजे, असं सांगत गंगेचं पाणी पिण्यास त्यांनी नकार दिल्याचा किस्साही ऐकवला होता. राज ठाकरे यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून टीकेची झोड उठवली गेली. राज ठाकरे यांनी हिंदू धर्माचा अपमान केल्याचं सत्ताधाऱ्यांनी म्हटलं. सत्ताधाऱ्यांच्या या टीकेचा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. गंगा स्वच्छ झालेली नाही. स्वच्छतेच्या नावाखाली प्रचंड भ्रष्टाचार झाला. हे भाजपचंच पाप आहे, असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. अविनाश जाधव हे मीडियाशी संवाद साधत होते.
मला वाटत राज ठाकरे यांचे वक्तव्य ऐकले तर गंगे संदर्भात त्यांनी केलेले वक्तव्य ही सर्व भारतातील जनतेची भावना आहे. राज ठाकरे यांचा गंगेमध्ये अंघोळ करण्यास विरोध नाही. पण जी घाण केली जाते त्याला त्यांचा विरोध आहे. गंगा स्वच्छतेसाठी 20 हजार कोटी रुपये खर्च केले. त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला. भाजपची ओरड ही गंगा स्वच्छतेवर खर्च केलेल्या 20 हजार कोटीच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठीची आहे. त्यासाठी टीकेचा खटाटोप आहे. तो भ्रष्टाचार आहे. भाजपने माफी मागितली पाहिजे. पाप भाजपाचेच आहे, असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.
Raj Thackeray आम्हाला हिंदुत्व शिकवू नये
आम्हाला हिंदुत्वाच्या गोष्टी भाजपाने शिकवू नये. जे बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांना जमले नाही ते राज ठाकरे यांनी केले. मशिदीवरील भोंगे राज ठाकरेंनी उतरवले. राज यांनी आपली हिंदुत्वाची भूमिका बदलली नाही. फक्त परिस्थिती समाजा समोर मांडली. गंगेचे पाणी वापरण्या योग्य नाही हे अनेकांनी शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करून दाखवले आहे. पण भाजपची खरं ऐकण्याची क्षमता नाही. आपल्याला हवं तेच हिंदुत्व अशी अवस्था भाजपची झाली आहे, असा हल्लाही जाधव यांनी चढवला.
Raj Thackeray नितेश राणेंना चिमटा
यावेळी त्यांनी नितेश राणे यांच्यावरही टीका केली. राज ठाकरे प्रत्येक वेळी हिंदुत्वावर बोलतानाच रस्त्यावरचे नमाज आणि मशिदीवरील भोंग्यांवरही बोलले आहेत. नितेश राणे यांनी राज ठाकरे यांची भाषणे ऐकली पाहिजेत. त्यांना हवे असल्यास राज ठाकरे यांच्या भाषणे मी पाठवून देईल, असा चिमटा त्यांनी काढला.
Raj Thackeray हे ठाणेकरांना माहीत आहे
ठाण्यातील आनंद आश्रमावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ठाण्यातील आनंद आश्रमातून कारभार काय चालतो हे सर्वांना माहीत आहे. त्यासाठी तीन कोटीचा निधी खर्च करून तिथे कुणाला आरामासाठी रूम बनवणार आहे हे माहीत आहे. त्यावर केला जाणारा खर्च योग्य नाही. दिघे साहेब झोपडीत राहून आपला कारभार करत होते. पण आता त्यांच्या नावावर राजकारण करणारे कोणाच्या ऐषोआरामासाठी रूम बनवणार आहे हे ठाणेकरांना माहिती आहे, असा टोला त्यांनी लगावला.