राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनाचा पाचवा दिवस धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला की नाही, त्याची माहिती सभागृहाला दिली नाही यावरून विरोधकांनी शुक्रवारी विधानसभेत गोंधळ घातला. तसेच सरकार चुकीचे पायंडे पाडत असल्याची टीका राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली. या मुद्द्यावरून विरोधकांनी काही काळ सभात्याग केला.
सध्या राज्यात बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड हा राष्ट्रवादी नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांच्या राजीनाम्याची वारंवार मागणी होत होती. मात्र, अधिवेशन सुरू होईपर्यंत मुंडे यांनी राजीनामा न दिल्याने या अधिवेशनात राष्ट्रवादी नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून सरकारला घेरण्याची विरोधकांची योजना होती. मात्र, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वीच फडणवीसांनी मुंडे यांचा राजीनामा आपल्याला मिळाल्याची माहिती सभागृहाबाहेर दिली. यावरूनच आज सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीडचे नेते धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनाम्याची माहिती मंत्रिमंडळाच्या सभागृहाला माहिती दिली नाही. यातून सभागृहाचा हक्कभंग झाला आहे. नियमभंग झाला आहे. सभागृहाचे कामकाज नियमबाह्य पद्धतीने सुरू असल्याचा आरोप करत विरोधकांना सभात्याग केला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांच्या या नियमबाह्य कामकाजावर घणाघात केला आहे.
पोटावर बेदम मारहाण , नाकामधून रक्त अन्…, संतोष देशमुखांचा PM अहवाल समोर
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती सरकारकडून सभागृहाला देण्यात आली नाही. प्रसार माध्यमांच्या माध्यमातून त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री जाहीर करतात, ही सभागृहाची प्रथा परंपरा नाही. याबद्दल आम्ही सभागृहात खेद व्यक्त केला. तसेच, हा सभागृहाचा अवमान असल्याने महाविकास आघाडीच्या सर्व विधानसभा सदस्यांनी सभात्याग केला. तसेच तुम्ही चुकीचे पायंडे पाडत आहात, असे सांगत जयंत पाटील यांनी सरकारचे कान टोचले.
तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एरवी सांगतात की, महाराष्ट्रातील विधानसभेच्या कामकाजाचे इतर राज्यांत कौतुक होत आहे. आदर्श म्हणून या सभागृहाकडे पाहिले जाते. अशाप्रकारे चुकीच्या प्रथा पाडणे, चुकीचे पायंडे पाडणे हेच तुमचे आदर्श कामकाज आहे का, अशी खोचक विचारणा देखील विरोधकांनी केली.