राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक आनंदवार्ता दिली आहे. गेल्या 10 वर्षांतील गुंतवणूक अवघ्या 9 महिन्यात मिळाल्याचे ट्विट फडणवीस यांनी केले. यापूर्वी बोलताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र 2030 पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याचा मानस बोलून दाखवला होता. तर महाविकास आघाडीच्या काळात ग्रोथ रेट निगेटिव्ह असल्यानेच राज्याला सेटबॅक बसल्याचे वक्तव्य सुद्धा त्यांनी केले होते. दरम्यान त्यांनी परकीय गुंतवणुकीचा आकडा समोर आणत महायुती सरकारची पाठ थोपटली.
Devendra Fadnavis महाराष्ट्राचा गुंतवणुकीत विक्रम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीची आकडेवारीच सादर केली. त्यांनी याविषयीचे खास ट्विट केले. त्यानुसार, केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर 2024 अखेरचा अहवाल जाहीर केला असून, गेल्या 10 वर्षांतील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या 9 महिन्यात महाराष्ट्राने प्राप्त केली आहे. 2024-2025 या आर्थिक वर्षातील पहिल्या 9 महिन्यात आतापर्यंत एकूण 1,39,434 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली आहे. ही गेल्या 10 वर्षांत महाराष्ट्रात कोणत्याही एका वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक आहे, असे म्हटले आहे.
Devendra Fadnavis महायुती सरकारचा यापूर्वीचा विक्रम मोडीत
असे करताना महायुती सरकारने आपलाच 2016-17 या आर्थिक वर्षाचा विक्रम मोडला आहे. अर्थात या आर्थिक वर्षातील एक तिमाही आणखी बाकी आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन, मुख्यमंत्र्यांनी या ट्विटच्या माध्यमातून केले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड ही अशीच कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला.
Devendra Fadnavis आता चौथी मुंबई वाढवणजवळ
मुंबईचा कायापालट करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला. मुंबई आणि MMR मध्ये विविध प्रकल्पाचे वेगाने काम सुरू आहेत. त्यातच मुंबईच्या वाढवण बंदराजवळ विमानतळ उभारण्यात येणार आहे. याच ठिकाणी चौथी मुंबई वसवण्यात येणार आहे. तर वाढवण बंदर हे जेएनपीटी पेक्षा तिप्पट मोठे असेल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.