मुंबईत विविधतेमध्ये एकता आहे. मुंबईत शहरात विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. त्यामुळे त्यांची वेगवेगळी भाषा आहे. घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे, असे नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर चौफेर हल्ला होत आहे. शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भैय्याजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
Uddhav Thackeray उद्धव ठाकरे काय म्हणाले
उद्धव ठाकरे म्हणाले, काल अनाजीपंत म्हणजे भैय्याजी जोशी येऊन गेले. त्यांनी मुंबईत येऊन सांगितले की मुंबईत राहणाऱ्यांना मराठी आलेच पाहिजे, असे नाही. त्यांच्या या वक्तव्यावरुन संघाचा हा छुपा अजेंडा आहे का? संघाचे दाखवण्याचे दात वेगळे आहे आणि खाण्याचे दात वेगळे आहे का?. ‘बटेंगे ते कटेंग’ म्हणतात. त्या ‘बटेंगे ते कटेंग’चा अर्थ म्हणजे हिंदू-मुस्लीम नाही. मराठी -अमराठी आणि मराठा आणि अमराठा असा आहे. ते असा द्वेष निर्माण करुन वाटणी करणार आहे. त्या अनाजीपंत यांनी मुंबईत जी अशी भाषा केली ती दक्षिण भारतात करुन दाखवावी. गुजरातमध्ये करुन दाखवावी, त्यानंतर महाराष्ट्रात सुखरुप येऊन दाखवावे, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी केले.
Uddhav Thackeray राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा
उद्धव ठाकरे म्हणाले, भैय्याजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. महाराष्ट्रात फूट पाडणारे ही लोक अनाजीपंत आणि औरंगजेब आहेत. ते मराठी-अमराठी विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे. कोणी कितीही विष कालवण्याचा प्रयत्न केला तरी मुंबई महाराष्ट्रापासून हिसकवू देणार नाही. मुंबई तोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाषावर प्रांतरचना देशाची झाली. आता हे मुंबईची प्रांतरचना करत आहे.
भैय्याजी जोशी चिल्लर माणूस आहे, हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे. महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची करण्याचा कायदा मी मुख्यमंत्री असताना केला होता. त्यामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. दोन्ही सभागृहात गोलमाल उत्तर दिली गेली आहे. ठाम उत्तर दिले नाही. मराठी भाषेचे महत्व भाजपला कळत नाही. त्यामुळे आज राज्य सरकारला तुमचे डोके ठिकाणावर आहे का? असे विचारावे लागत आहे.