मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) यांनी अखेर 82 दिवसानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आज सकाळी त्यांचा राजीनामा घेऊन त्यांचा पीए सागर बंगल्यावर पोहोचला. तो मुख्यमंत्र्यांकडे सोपवला. धनंजय मुंडे यांचा राजीनामा आपण स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोड्या वेळापूर्वीच सांगितलं.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. या हत्याकांडात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आल्यानंतर अखेर आज मुंडे यांनी राजीनामा दिला.त्यांच्या पीएने सागर बंगला गाठून राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला. मुख्यमंत्री फडणवीसांनी तो राजीनामा स्वीकारल्याचे थोड्यावेळापूर्वीच नमूद केलं. आता या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. धनंजय मुंडे यांनी X या सोशल मीडिया नेटवर्किंग साईटवर एक ट्विट केलं आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, असे मुंडे यांनी ट्विट मध्ये नमूद केलं आहे. आपण वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे, तर नैतिकतेच्या आधारावर मुंडे यांनी राजीनामा दिल्याची मोघम प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.
9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. तेव्हाच विरोधकांनी ही अत्यंत क्रूर हत्या झाल्याचा आरोप केला होता. काल समाज माध्यमांवर सीआयडीच्या दोषारोपपत्रा सोबत हत्येचे काही बयानक व्हिडीओ आणि फोटो समोर आले. त्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य मास्टरमाइंड वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. याआधी सुद्धा याच मुद्यावरुन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी करण्यात आली होती. पण सरकारने त्यांचा राजीनामा घेतला नाही. पण काल हे फोटो समोर आल्यानंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला. काल रात्री देवगिरीवर झालेल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचा आदेश दिला.त्यानंतर आज सकाळी धनंजय मुंडे यांचा पीए हा त्यांचा राजीनामा घेऊन सागर बंगल्यावर पोहोचला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी तो राजीनामा स्वीकारल्याचे माध्यमांसमोर सांगितलं.