ओएसडी आणि खासगी सचिव नेमताना फिक्सर अधिकाऱ्यांच्या नावाला मंजूर देणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले होते. त्यानंतर फडणवीस यांनी 125 पैकी 109 जणांना मान्यता दिली आहे. 16 फिक्सर अधिकाऱ्यांना फडणवीसांनी डच्चू दिला आहे. या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी स्वागत केले आहे. तसेच, तत्कालीन महाविकास आघाडी आणि शिंदे सरकार असताना चार मंत्र्यांच्या ‘ओएसडीं’नी त्रास दिला, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.
Amol Mitkari भुमरेंचा नकार अन् अजून तीन जणांची नावे समोर
मिटकरी यांनी सुरूवातीला माजी मंत्री, खासदार संदीपान भुमरे यांच्या तत्कालीन ‘ओएसडी’वर गंभीर आरोप केला होता. भुमरेंच्या ‘ओएसडी’ने 5 कोटींच्या कामासाठी 5 लाखांची मागणी केली होती, असे मिटकरींनी मंगळवारी ( 25 फेब्रुवारी ) सांगितले होते. यावर बोलण्यास भुमरेंनी नकार दिला. यातच आता मिटकरींनी पुन्हा शिंदेंच्या तीन माजी मंत्र्यांच्या तत्कालीन ‘ओएसडीं’वर आरोप केले आहेत.
Amol Mitkari …म्हणून सत्तार अन् सावंत मंत्रिमंडळाबाहेर
मिटकरी म्हणाले, “महाविकास आघाडी आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात संदीपान भुमरे यांच्यासोबत तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत, संजय राठोड, अब्दुल सत्तार यांच्या ‘ओएसडी’संदर्भातही असेच अनुभव आले. त्यामुळे अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत आज मंत्रिमंडळात नाहीत.”
Amol Mitkari सत्तारांच्या तत्कालीन ओएसडीचे प्रताप
“अकोलाच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर नेमलेल्या राज्यपाल नियुक्त नावांमध्ये तत्कालीन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे ओएसडी विवेक मोगल यांनी आर्थिक व्यवहार केला. मोगल यांनी विदर्भाच्या विद्यापीठावर बाहेरील प्रतिनिधी नेमले,” असा आरोप मिटकरींनी केला आहे.
Amol Mitkari आमदारांना निधी कसा मिळतो, ते विचारा..
“आपल्या मतदारसंघात हजारो कोटींची विकामकामे केल्याचा दावा करणाऱ्या आमदारांना हा निधी कसा मिळतो? हेही एकदा विचारा,” असा सवाल मिटकरींनी उपस्थित केला आहे.