मंत्र्यांचे पीएस आणि ओएसडी नेमण्याचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांचे असतात. त्याप्रमाणे राज्यातील मंत्र्यांकडून 125 पीएस आणि ओएसडींची नावे मुख्यमंत्री फडणवीसांना देण्यात आली होती. त्यातील 109 नावे फडणवीसांनी क्लिअर केली आहेत. तर त्यातील 16 जण फिक्सर अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी सुरू करण्यात येत आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी दोन दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांना याबाबतची माहिती दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी केली आहे. ज्या मंत्र्यांनी फिक्सर अधिकाऱ्यांची नावे दिली आहेत, त्या मंत्र्यांची नावे जाहीर करावीत, अशी मागणी राऊतांकडून करण्यात आली आहे. (Sanjay Raut asked for list of ministers giving the names of Fixer OSD, PA)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज बुधवारी (ता. 26 फेब्रुवारी) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी फिक्सर ओएसडी आणि पीए यांच्याबाबत म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार दिवसांपूर्वी बिहारच्या भागलपूरमध्ये भाषण केले. त्या भाषणातून त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केला. त्यात त्यांनी सांगितले की, मी कोणाला खाऊ देणार नाही. जनतेला त्यांनी आवाहन केले की, जर कोणी खाणारे असतील तर मला त्यांची नावे कळवा. मी पुढचं बघून घेईल. आम्ही त्यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळातील 24 मंत्र्यांची नावे देणार आहोत, त्यावेळी ते काय करतात ते बघू, असे आव्हान राऊतांकडून देण्यात आले आहे.
2026 पासून वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्ड परीक्षा
तर, पंतप्रधान मोदींना मंत्र्यांची नावे कळवायची गरज नाही. कारण त्यांना माहीत आहे की, इथे बसून कोण खात आहे. मागच्या तीन वर्षात महाराष्ट्र कोणी लुटला. हे त्यांना माहीत आहे. पण हे काम मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी केले पाहिजे. पंतप्रधान मोदी हे सर्वांचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी भ्रष्टाचाऱ्यांची नावे कळवण्याचे आवाहन केले आहे. ज्या 16 फिक्सर ओएसडी आणि पीएंची नावे ज्या मंत्र्यांनी पाठवली आहेत. त्या फिक्सरांची नावे पाठवा. म्हणजे कोणत्या मंत्र्यांने कोणत्या फिक्सरचे नाव पाठवले, ते लोकांना कळायला पाहिजे, पंतप्रधानांना समजायला पाहिजे, अशी मागणी राऊतांनी केली आहे.
तसेच, देवेंद्र फडणवीसांना कोणत्या अडथळ्यातून काम करायला लागत आहेत, हे कळत आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे स्वागत केले आहे. त्यांनी जी भूमिका घेतली आहे की, कोणताही भ्रष्ट किंवा फिक्सर अधिकारी हा मंत्र्यांचा पीए, ओएसडी असणार नाही. हा त्यांचा कठोर निर्णय स्वागतार्ह आहे, असेही यावेळी राऊतांनी सांगितले आहे. मात्र, नैतिकतेचा मुद्दा यावर भाजपाचे खूप प्रेम आहे. पण देवेंद्र फडणवीसांनी लहान मासे जाळ्यात पकडण्याऐवजी मोठ्या माशांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी सुद्धा यावेळी राऊतांकडून करण्यात आली आहे.