साहित्य संमेलनात शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. त्यानंतर महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्यांनी त्याला उत्तर दिले नाही. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार हे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. परंतु ते या विषयावर गप्प आहेत. त्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोमवारी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला केला. या प्रकरणात शरद पवार आपली जबाबदारी नाकारु शकत नाही. तेसुद्धा याला जबाबदार आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.
Sanjay Raut संजय राऊत काय म्हणाले ?
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय चिखलफेक झाली. त्याची जबाबदारी शरद पवार नाकारु शकत नाही. ते सुद्धा त्याला जबाबदार आहे. संमेलन अध्यक्षा उषा तांबे जबाबदार आहेत. तुमच्यावर (शरद पवार) चिखलफेक होते तेव्हा आम्ही उभे राहतो ना? मग आता उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप होत असताना पवार साहेब गप्प कसे राहू शकतात? नीलम गोऱ्हे ही कोण बाई आहे, ते कोणते भूत आहे. हे साहित्य संमेलन नव्हतेच, त्यात राजकारण झाले, असा घणाघात राऊत यांनी केला.
Sanjay Raut साहित्य मंडळाने खंडणी घेतली
संजय राऊत यांनी साहित्य महामंडळावर आरोप केले. ते म्हणाले, महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी तुम्ही साहित्य संमेलन घडवले का? साहित्य महामंडळ खंडणी घेऊन संमेलन भरवत आहे. सरकारने दोन कोटी दिले तर २५ लाख खंडणी म्हणून काढून घेण्याचे काम साहित्य महामंडळ करत आहे. कार्यक्रम ठरवतात महामंडळ आणि आयोजक सतरंजी उचलण्याचे काम करत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
संमेलन अध्यक्षा उषा तांबे कोण आहेत? ते मला माहीत नाही. त्यांचे मराठी साहित्यात काय योगदान आहे? उषा तांबे यांचे पती पीडब्लूडी विभागात सचिव होते. ते सर्वात भ्रष्ट खाते आहे. या सर्व प्रकरणात आता साहित्य महामंडळाने माफी मागायला हवी. आतापर्यंत साहित्य विषयावर आम्ही बोललो नव्हतो. आम्ही लिखाण करणारे माणसे आहेत. आम्हालाही साहित्य माहीत आहे, असे राऊत यांनी म्हटले.