महायुतीच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. यामधील मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांचा पाय तर वारंवार खोलात जात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे विरोधकांच्या हाताला आयते कोलीत लागले आहे. त्यामुळे भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून विरोधक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत आहेत. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी याच मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. नैतिकता या सरकारच्या आसपासही फिरकत नसून भ्रष्टाचारी मंत्र्यांच्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस गप्प का? असा खोचक सवाल खासदार राऊतांकडून (Sanjay Raut) उपस्थित करण्यात आला आहे. (Sanjay Raut question to Devendra Fadnavis on the issue of resignation of corrupt ministers)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी (ता. 23 फेब्रुवारी) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महायुतीतील भ्रष्ट मंत्री आणि त्यांच्या राजीनाम्यावरून प्रश्न विचारण्यात आला. मविआचे सरकार असताना ज्या मंत्र्यांवर आरोप होते, त्या मंत्र्यांचे राजीनामे घेण्यासाठी त्यावेळच्या भाजपातील विरोधकांनी भाग पाडले होते. पण आता तेच विरोधक सत्तेत असताना त्यांच्याकडून असे काहीही होताना दिसत नाही, असे राऊतांना विचारण्यात आले. त्यावेळी खासदार संजय राऊत यांनी उत्तर देत म्हटले की, नैतिकता या सरकारच्या आसपासही फिरकत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यावेळी संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला होता. ती मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली होती. पण आता तेच संजय राठोड यांच्या मांडीवर बसले आहेत, असा टोला राऊतांनी लगावला आहे.
तसेच, मागमी केल्यानंतर लगेच राजीनामा घेणे, याला नैतिकता म्हणतात. ज्यांच्यावर तुम्ही हत्या, बलात्कार, व्याभिचार, भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांचा राजीनामा घेणे याला नैतिकता म्हणतात. आम्ही सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते होते. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यावेळी ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचे राजीनामे मागण्यात आले. मग आता कोर्टाने ज्यांना भ्रष्टाचारी ठरवले आहे आणि शिक्षा ठोठावली आहे, त्यांच्याबाबतीत देवेंद्र फडणवीस गप्प का? हा एक विषय आहे. नैतिकतेच्या गोष्टी भाजपा फार करत असते. पण नैतिकता त्यांच्या आसपासही फिरकत नाही. नैतिकता भाजपाजवळ जायला घाबरते, असे म्हणत राऊतांनी भाजपाला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आणि महायुतीच्या नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत.