काल पुण्यात झालेल्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कोण हे स्पष्ट झाल्याचे वक्तव्य केले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाह हे लोहपुरूष असल्याचा गौरव केला. त्यावर आज उद्धव ठाकरे गोटातून थेट प्रतिक्रिया आली. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सकाळी सकाळीच भाजपासह शिंदेंच्या शिवसेनेवर चौफेर गोळीबार केला. त्यांनी एकामागून एक तोफ गोळे डागले. त्यांच्या वक्तव्याने रविवारी सुद्धा राजकीय वातावरण तापवले. काय म्हणाले राऊत?
Sanjay Raut वो डरा हुआ आदमी
यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या अमित शाह यांच्याविषयीचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. अमित शाह लोहपुरूष मग सरदार वल्लभभाई पटेल कोण?, बाळासाहेब ठाकरे कोण? असा प्रतिप्रश्न करत त्यांनी शिंदेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ‘वो डरा हुआ आदमी’ असे वक्तव्य शिंदेंविषयी केले.
Sanjay Raut मग खरी शिवसेना कोणती हे कळेल
सत्तेतील मंडळी ही लाचार आणि डरपोक आहे, असे ताशेरे त्यांनी ओढले. अमित शाह जेव्हा सत्तेत नसतील तेव्हा खरी शिवसेना कोणती आणि खोटी कोणती हे कळेल, असे त्यांनी सांगितले. मी पुन्हा एकदा सांगतो, की शाह सत्तेत नसतील तेव्हा खरी आणि खोटी शिवसेना कोणती याचा फैसला होईल, असे त्यांनी ठणकावले. आज दहशत, पैशाची ताकद, निवडणूक आयोग हातात यामुळे हे घडल्याचा आरोप त्यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा पक्ष आणि चिन्ह घेऊन निवडणुकीत उतरावे आणि पाच आमदार निवडून आणून दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले. बाळासाहेब ठाकरे यांच्या घरात घुसून त्यांनी चोऱ्यामाऱ्या करत पक्ष आणि चिन्ह चोरल्याचा आरोप त्यांनी केला. आम्हाला अमित शाह यांची दादगिरी दाखवू नका. ते काही अमृत पिऊन आले नाही. एक ना एक दिवस सर्वांना जावेच लागेल असे ते म्हणाले. जनता त्यांचा फैसला करेल, असे राऊत म्हणाले.
Sanjay Rautशिंदे अटकेला घाबरत आहेत
कन्नडगींच्या हैदोसामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील एसटी वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यावर राऊतांनी भाष्य केले. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संयुक्त बैठक घेत, चर्चेतून त्यावर तोडगा काढण्याचे आवाहन त्यांनी केले. हा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सीमा प्रश्नावर तोडगा काढण्याचे आवाहन त्यांनी केले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याविषयीची जबाबदारी असताना अटकेच्या भीतीने ते बेळगावमध्ये जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.