देशभरातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी एक मोठी घोषणा केलीय. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता (PM Kisan Yojana) लवकरच खात्यात जमा होणार आहे. यावेळी 9.80 कोटी शेतकऱ्यांना 22,000 कोटी रुपये मिळणार आहेत. पंतप्रधान मोदी (PM Modi) 24 फेब्रुवारी रोजी भागलपूर येथून या भागाचं प्रकाशन केलं जाणार आहे. यासोबतच किसान क्रेडिट कार्डची मर्यादाही 5 लाख रुपये करण्यात आली आहे. एवढंच नाही तर, मखाना उत्पादक शेतकऱ्यांसाठी मखाना बोर्ड देखील तयार केलं जातंय.
पीएम-किसान योजना 2019 मध्ये सुरू झाली होती. या योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना (Farmer) दरवर्षी 6,000 रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. दर चार महिन्यांनी त्यांच्या खात्यात 2,000 रुपयांचा हप्ता हस्तांतरित केला जातो. पूर्वी 9. 60 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता. आता यामध्ये लाभार्थ्यांची संख्या 9.80 कोटी झाली आहे. 19 व्या हप्त्यासह, शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 3.68 कोटी रुपये मिळालेत.
यावर शिवराज सिंह चौहान म्हणाले की, 24 फेब्रुवारी रोजी बिहारमधील भागलपूरमध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि इतर मंत्री सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम डीडी किसान, यूट्यूब, फेसबुक आणि ५ लाखांहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटर्स (सीएससी) वर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे.
शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे, कारण केसीसी मर्यादा वाढवण्यात आली आहे. पूर्वी शेतकऱ्यांना केसीसीवर 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळत असे. आता ही मर्यादा 5 लाख रुपये करण्यात आली आहे. यामुळे बागायती पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल. सरकारने आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते जारी केलेत.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थीला दर चार महिन्यांनी 2 हजार रुपये देते. वर्षभरात तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये एकूण 6 हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातात. आधार कार्ड, बँक खात्याची माहिती, जमिनीच्या मालकीची कागदपत्रे आणि मोबाईल नंबर ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्वाची कागदपत्रे आहेत.