राज्यात थंडी कमी झाली असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. (Weather Update) येणाऱ्या काही दिवसांत उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर भारतात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकतो. याचाच परिणाम दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील तुरळक भागात हलक्या पावसाची शक्यता आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तापमानात सध्यातरी कोणताही बदल होणार नाही. पण, उत्तर महाराष्ट्रातील वातावरण चढ-उतार पाहायला मिळणार आहे. तर, विदर्भातील तापमानात फारसा बदल होणार नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Weather Updatev हवामान विभागाने काय म्हटले?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढचे काही दिवस राज्यातील तापमानाचा पारा वाढलेला राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. पण, उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवस किमान तापमान 1 ते 2 अंशांनी घटणार आहे. नंतर हळूहळू 2 ते 3 अंशांनी वाढण्याचा अंदाज आहे. विदर्भातील कमाल आणि किमान तापमानता फारसा बदल होण्याची शक्यता नाही.
पुणे हवामान विभागाचे माजी संचालक के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ( 21 फेब्रुवारी ) मुंबईकरांना प्रचंड उन्हाचा त्रास सहन करावा लागला आहे. मुंबईतील सांताक्रूझ येथे शुक्रवारी 37.3 अंश सेल्सिअस तापमान होते. जे सरासरीपेक्षा 4.3 अंशांनी अधिक आहे. कुलाब्यातील तापमान 34.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. जे सरासरीपेक्षा 3.7 अंशांनी अधिक आहे. पुढील दोन दिवस मुंबईत तापमान 36 अंश राहू शकते.