विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती (Mahayuti) सरकारने मोठा निर्णय घेत राज्यातील महिलांना एसटी (ST Bus) प्रवासात 50 टक्के सवलत (ST Discount) देण्याची घोषणा केली होती. सरकारच्या या निर्णयानंतर एसटी तोट्यात जात असल्याची टीका सरकारवर करण्यात येत होती मात्र एसटी तोट्यात नाही असं सरकारकडून सांगण्यात येत होतं. तर आता यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी भाष्य केलं आहे.
महिलांना व जेष्ठांना एसटी प्रवासात सवलतीमुळे एसटीला दर दिवशी तीन कोटी रुपयांचा तोटा होत आहे. त्यामुळे यापुढे आता एसटीमध्ये कोणतीच सवलत नाही, असं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. ते धाराशिवमध्ये आयोजित व्हाईस ऑफ मेडिया कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात पत्रकारांना एसटीमध्ये सवलत द्या, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली होती. यावर उत्तर देत त्यांनी सवलतीमुळेच एसटी बस तोट्यात गेल्याचे वक्तव्य केलं. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारकडून महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत तर ज्येष्ठांना मोफत बस सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या योजनांमुळेच एसटी तोट्यात गेली अशी कबुली परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली आहे.
ST Bus काय म्हणाले प्रताप सरनाईक?
या कार्यक्रमात बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, महिला आणि ज्येष्ठांना एसटी प्रवासात सवलत देण्यात आली. यामुळे एसटीला दर दिवशी 3 कोटी रुपयांचा तोटा होतो आहे. त्यामुळे यापुढे एसटीमध्ये कोणतीच सवलत नाही. असं प्रताप सरनाईक म्हणाले. लाडक्या बहिणींना बस मध्ये 50% सवलत, ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली आहे. अशीच सवलत आपण जर सर्वांना देत बसलो तर मला असं वाटतं महामंडळ चालवणं कठीण होईल, त्यामुळे सध्या तरी या मागणीचा मी विचार करू शकत नाही. असेही ते म्हणाले.
तसेच गाव खेड्यापर्यंत एसटी पोहोचली पाहिजे. ज्या भागात एसटी जात नाही, त्या भागात एसटी पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे असेही या कार्यक्रमात बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले.